सोलापूर – जिल्ह्यात हातावर मजकूर लिहून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणात कुटुंबातील ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेमध्ये ही घटना घडली आहे. विवाहितेने आयुष्य संपवले आहे. कुटुंबातील चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल रणदिवे असे मृत विवाहितेचे नाव आहे. पायल रणदिवे या महिलेला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते. यासाठी तिने क्लासही लावला होता.
मात्र कुटुंबाने तो क्लास बंद केल्याचे दुःख होते. विवाहिता पायल रणदिवे हिने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर काही मजकूर लिहून ठेवले आहे. शनिवारी सायंकाळी घरात कोणी नसताना पायल रणदिवे हिने आत्महत्या केली आहे. पायलच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा दिसल्या आहेत. या महिलेच्या वडिलांनी पतीसह कुटुंबातील सासू-सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याची तक्रार दिली आहे.
पायल रणदिवे ही माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरी राहत होती. आता पोलिसांनी या प्रकरणात पती शशिकांत रणदिवे याच्यासह तिचे सासू-सासरे यांना अटक केली आहे. पायलच्या दिराचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. पायल रणदिवे हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर मजकूर लिहिला होता.
यामध्ये तिने सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला, हे सविस्तरपणे लिहिले होते. पायलच्या शवविच्छेदना नंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणात नातेपूते पोलिसांनी तपास सुरू केला आहे.




