ठाणे – राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिय असणा-या ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा’ आणि ‘नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात संपन्न झाल्या.
राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या १२८ शरीरसौष्ठवपटूंमधून कोल्हापूरच्या अजिंक्य रेडकर यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत दीड लाख बक्षिस रक्कमेसह ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू २०२५ – २६’ किताबासह मानाचा नवी मुंबई महापौर श्री चषक स्विकारला. सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी ५० हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले.
‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री २०२५ – २६’ या नवी मुंबई महानगरपालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी 71 स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटूचे नमुंमपा क्षेत्र श्री विजेतेपद 70 हजार पारितोषिक रक्कम व मानाच्या चषकासहीत नेरूळच्या निरंत पाटील यांनी पटकाविले. नेरूळच्या अक्षय पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद 38 हजार रक्कमेसह संपादन केले.
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मोहम्मद जमाल, ठाणे यांनी ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर’ किताब तसेच स्वप्निल सकपाळ, रायगड यांनी ‘बेस्ट पोझर’ किताब पटकाविला. या दोघानांही प्रत्येकी रु. १५ हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली.
.
एकूण १९९ शरीरसौष्ठवपटूंच्या उत्साही सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याने सहा वर्ष कालावधीनंतर या स्पर्धा नवी मुंबई महापौर श्री या पूर्वीच्याच नावाने आयोजित करण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना महापौर महोदयांनी व्यायामाचा आणि आरोग्याचा अत्यंत निकटचा संबंध असल्याने शहरातील युवकांनी व्यायामाकडे वळावे जेणेकरून आपोआप ते व्यसनापासून दूर जातील व शहर सुदृढ व निरोगी होईल असे मत व्यक्त केले. अशा शरीरसौष्ठव स्पर्धांमधून युवकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने या स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्या म्हणाल्या. यापुढील काळात अधिकाधिक स्पर्धक यामध्ये सहभागी होतील असा महानगरपालिकेचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले व राज्यभरातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंचे स्वागत केले. महापौर महोदयांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री पुरस्कार वितरण करण्यात आले.
समारोपप्रसंगी राज्यस्तरीय महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना उपमहापौर श्री दशरथ भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा क्षेत्रात उदयोन्मुख गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. सर्व खेळांतील क्रीडापटूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी घणसोली येथे भव्यतम क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे आगामी काळात राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजनाचा मनोदय असल्याचे ते म्हणाले.
शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी तथा माजी खासदार श्री.संजीव नाईक यांनी १९९६ पासून सातत्याने यशस्वीपणे आयोजित केल्या जात असलेल्या या स्पर्धेचे आकर्षण संपूर्ण राज्यातील शरीरसौष्ठवपटूंना असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिका शहरातील युवकांना शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी प्रोत्साहित करीत असल्याची माहिती दिली व सर्वांचे स्वागत केले.
स्पर्धा शुभारंभप्रसंगी महापौर श्रीम सुजाता सुरज पाटील, क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम अभिलाषा म्हात्रे – पाटील, क्रीडा अधिकारी श्री रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता श्री प्रवीण गाडे, महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे सेक्रेटरी श्री राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष श्री गोपाळ गायकवाड, पदाधिकारी श्री शरद मारणे व श्री अजय गोळे, नवी मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष श्री जी एस पाटील व सेक्रेटरी श्री हेमंत खेबडे, श्री विनय मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी उपमहापौर श्री. दशरथ भगत, माजी खासदार व बॉडी बिल्डींग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजीव नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ किलोपर्यंत व ८५ किलोवरील अशा 8 वजनी गटांमध्ये आयोजीत करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा ५०, ५५, ६०, ६५, ७० किलोपर्यंत व ७० किलोवरील अशा ६ वजनी गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ६ व ५ विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सायं. ५ वाजल्यापासून रात्री १२.१५ वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाटयगृहात शरीरसौष्ठवपटूंचा व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या क्रीडारसिकांचा जल्लोश होता.




