रांची – झारखंड राज्यामध्ये खासगी विमानाचा अपघात झाला आहे, तर या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. हे खाजगी विमान झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात पडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी विमानाचा अपघात झाला आहे.
या विमानात चालक दलातील २ सदस्यांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान या अपघातानंतर एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट सी-९० विमान रांची दिल्ली मार्गावर एअर अँब्युलन्स उड्डाण करत होते. डीजीसीएच्या माहितीनुसार, विमानाने सायंकाळी रांचीहून उड्डाण केले.
कोलकाता एटीसीशी संपर्क प्रस्थापित केल्यानंतर सायंकाळी ७.३४ वाजता दक्षिण-पूर्व वाराणसी परिसरात रडार आणि रेडिओ संपर्क तुटला होता. त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली असून एएआयबीकडून चौकशी सुरू आहे. सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासियातू करमटांड जंगलात विमानाचे अवशेष दिसून आले आहे. ते विमानाचे अवशेष असण्याची शक्यता आहे.
यात प्रोपेलर आणि विमान इंजिनचे भाग दिसून आले आहेत. वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार, हे विमान त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर संपर्कात आले नाही. पायलटची शेवटची बातचीत कोलकाता क्षेत्रातील संपर्क कक्षाशी झाली होती. संपर्क तुटल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने, रात्री आठ वाजता रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर सक्रिय करण्यात आले आहे. आणि शोध-बचाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या विमान अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.




