अहिल्यानगर – शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. तर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकाला अटक करण्यात आली आहे, या घटनेमूळे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमनेर शहरात शिवजयंतीच्या वादातून एका तरुणावर ५ जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.
त्याच्यावर संगमनेरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल आहे. या घटनेत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ममता रोहित वाळके, श्रीरामनगर यांचे पती रोहित वाळके हे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी इंदिरानगर येथील म्हसोबा मंदिर जवळील मैदानावर मॅच खेळण्यासाठी गेले होते. यावेळी हल्लेखोरांनी शिवजयंतीच्या वादाचा राग मनात धरून रोहित यांच्यावर हल्ला केला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचत असताना, रोहित यांचा मित्र उत्तम काकड याला आरोपींनी ओढल्यामुळे वाद झाला होता. याच कारणावरून या ५ जणांनी त्यांच्याशी शिवजयंतीमधील वादावरून मारहाण केली आहे. त्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने रोहित यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेत अथर्व रासने, ओम काथे, साहिल देवरे, सुमित शेवंते व शनेश रोकडे सर्व संगमनेर यांनी, रोहित वाळके यांच्या मानेवर कोयत्याने वार केला, खांद्यावर कोयता मारून गंभीर दुखापत केली आहे, तसेच बेल्टने आणि लाथाबुक्कयांनी बेदम मारहाण केली आहे.
या घटनेनंतर जखमी रोहित वाळके यांना संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ममता रोहित वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रजिस्टर नंबर १६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८\(१ ), ३५२ , ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३ ), १९० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यामध्ये अथर्व रासने याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक पगारे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. अहिल्यानगरमधील संगमनेर शहरात अशा प्रकारे शस्त्राने हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणात अधिक तपास संगमनेर पोलिस करत आहेत.




