नवी दिल्ली – देशात १ एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागु होणार आहे, तर भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील प्राप्तिकर दाखवावा लागणार आहे केंद्रसरकारने म्हटले आहे. देशभरात कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. देशात ६ दशकांहून अधिक काळ लागू असलेल्या जुन्या कायद्याची जागा नवा आयकर कायदा, २०२५ घेणार आहे. देशभरात येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवा आयकर कायदा २०२५ अंमलात येणार आहे.त्यासोबतच कर विवरणपत्रे, लेखा परीक्षण आणि विविध कर दाव्यांसाठी नवे मसुदा अर्ज फॉर्म्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या मसुद्यांवर हितधारकांकडून मते मागवण्यात आली आहेत. पुढील महिन्यात अंतिम नियम अधिसूचित होणार आहे. देशातील नव्या कायद्याअंतर्गत कर वजावटीवर अधिक काटेकोर लक्ष दिले जाणार आहे. नव्या तरतुदीनुसार, कर वजावटीचा दावा करताना भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील संबंधांची व देवाणघेवाणीची माहिती आता प्राप्तिकर विवरणपत्रात उघड करावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ भाड्याची रक्कम आणि घरमालकाचा पॅन देणे पुरेसे होते.
मात्र नव्या प्रणालीत नातेवाईकांमधील व्यवहारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामुळे खोटे किंवा फुगवून सांगितलेले घरभाडे भत्ता दावे प्राथमिक टप्प्यातच पकडले जातील, असा नव्या आयकर कायद्याचा उद्देश आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. या नव्या मसुद्यांमुळे सनदी लेखापाल आणि लेखा परीक्षकांवर अधिक जबाबदारी येणार आहे. परदेशी उत्पन्नावर घेतल्या जाणाऱ्या फॉरेन टॅक्स क्रेडिट दाव्यांसाठी स्वतंत्र आणि सखोल पडताळणी बंधनकारक केली जाणार आहे.
फॉर्म ४४ अंतर्गत लेखा परीक्षकांना परदेशी कर कपात प्रमाणपत्रे, प्रत्यक्ष पेमेंटचे पुरावे, चलन विनिमय दराचे अचूक रूपांतर आणि दुहेरी कर टाळण्यासाठी लागू असलेल्या कर करारांच्या अटी तपासाव्या लागणार आहेत. प्रशासकीय दृष्टीने पाहता, या बदलांचा खऱ्या करदात्यांना त्रास होणार नाही, असा दावा तज्ज्ञ करत आहेत. भागीदार संदीप झुनझुनवाला यांच्या मते, मालकी हक्क किंवा प्रत्यक्ष पेमेंटचा ठोस पुरावा नसलेल्या बनावट दाव्यांची अचूक ओळख पटवणे आता सोपे होईल.
आवश्यक असल्यास असे दावे फेटाळले जाऊ शकतात. आता देशात पॅन कार्ड आणि कर लेखा परीक्षणात कडक नियम केले जाणार आहेत. नव्या नियमांनुसार, कंपन्यांना पॅन कार्डसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल की, त्यांच्याकडे आधीपासून कोणताही पॅन अस्तित्वात नाही. एकापेक्षा अधिक पॅन वापरून होणारी फसवणूक रोखणे आणि डेटाबेसची विश्वासार्हता वाढवणे, हा यामागचा उद्देश आहे. तसेच फॉर्म २६ अंतर्गत कर लेखा परीक्षणात वैधानिक लेखा अहवालातील कोणत्याही प्रतिकूल निरीक्षणांचा कंपनीच्या नफा-तोट्यावर नेमका काय परिणाम झाला आहे, हे स्पष्ट करणे बंधनकारक असणार आहे.
देशातील डिजिटल माहितीवरही सरकारची नजर राहणार आहे. देशातील कंपन्यांना आता त्यांच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरची माहिती, डेटा ज्या क्लाउड सर्व्हरवर साठवला आहे त्याचा आयपी पत्ता, डेटा कोणत्या देशात संग्रहित आहे आणि भारतातील बॅकअप सर्व्हरचा पत्ता देणेही अनिवार्य केले जाणार आहे. देशातील नव्या आयकर कायद्याअंतर्गत पारदर्शकता, जबाबदारी आणि डिजिटल नियंत्रण वाढवण्यावर व कर वजावटीतील त्रुटींना आळा घालण्यासाठी नवा कायकर कायदा आणला जाणार आहे. देशभरातील घरमालक-भाडेकरूंना आता कराची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. नव्या आयकर कायद्यासंबंधी कडक नियम लागू केले जाणार आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.




