अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करण्यासाठी हजारो बारामतीकर पोलिस ठाण्यात

SHARE:

बारामती – अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करण्यासाठी हजारो बारामतीकर पोलिस ठाण्यात जमले आहेत. अजितदादांच्या अपघात प्रकरणात गून्हा दाखल व तपासाची मागणी करण्यासाठी आमदार रोहित पवार पोलीस ठाण्यात आले आहे, त्यांच्यासोबत हजारो बारामतीकर पोलिस ठाण्यात जमले आहेत. एफआयआर दाखल करून तपास करण्याच्या मागणीसाठी हजारो बारामतीकर एकत्र आलेले चित्र बारामतीत पाहायला मिळाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

बारामती पोलिस ठाण्यात बराच वेळ त्यांची पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर बारामतीकरांनी देखील मोठी गर्दी केली आहे. राजेंद्र पवार आणि रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार, पुतणे युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीतील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. बारामतीचा संपुर्ण परिसर घोषणांबाजीने दणाणून गेला आहे.

बारामती आणि महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला या अजित पवार विमान अपघात प्रकरणाची सत्यता जाणून घ्यायची आहे. राज्यातील सरकार व विमान वाहतूक खात्याकडून माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. बारामतीतील लोकांच्या मनात शंका वाढत आहे, असे राजेंद्र पवार म्हणाले आहेत. बारामतीतील आंदोलनकर्त्यांनी अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीवर सरकारवर व विमान खात्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचे जे सांगितले जात आहे, ते पूर्णपणे संशयास्पद आहे.

आम्हाला हा नियोजित घातपात वाटतोय, असा आरोप अजित दादा समर्थकांनी केला आहे. काही राजकारणी मंडळी पोलीसांना गुन्हा दाखल करण्यापासून रोखत आहेत, असा दावा बारामतीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, त्या व्हीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अपघाताचा सविस्तर रिपोर्ट सार्वजनिक करावा आणि वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी बारामतीत आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी म्हटले की, अजितदादांच्या अपघात प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात आम्ही सगळे रोहित पवार यांच्या पाठिशी आहोत. डीजीसीएच्या अहवालात विमान कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, असे असतानाही व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे. बारामती पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. जोपर्यंत अपघात प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे बारामतीतील कार्यकर्त्यानी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा