नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या सापडल्याचा प्रकार उघड

SHARE:

नागपूर – नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या सापडल्याचा प्रकार उघड झाला आहे. एम्स मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या सापडल्या आहेत, तर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामूळे नागपूरात खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती, खाणावळीतून किंवा कॉलेजच्या मेसमधून होत असते. मात्र याच मेसमधील जेवण मूलांच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरत आहे.

नागपूरमधील विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात अळ्या आणि वेगवेगळे छोटे किडे आढळून आले आहेत. त्याचे काही फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. मेडिकल कॉलेजच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या जेवणात हे कीडे आढळून आले आहेत. नागपूरमध्ये एम्स मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या जेवणात काही विद्यार्थ्यांच्या ताटात अळी दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे. फळांच्या तुकड्यांवर मृत किडा सापडल्याचे सांगितले जात आहे.

भाजीमध्ये अळ्या तसेच मशरूमच्या पदार्थात किडे असल्याची माहिती काही विद्यार्थ्याना मिळाली होती. काहींना जेवण संपल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे कळाले आहे. त्यामुळे कॉलेजमधील मूलांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेवर नागपूरच्या विद्यार्थ्यानी संताप व्यक्त केला आहे. नागपूरमधील एम्स महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. महाविद्यालय प्रशासनाने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंची सत्यता तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संस्थेतील प्राध्यापक, डीन आणि वरिष्ठ अधिकारीही त्याच मेसमध्ये जेवण घेतात, असेही प्रशासनाने म्हटले आहे. जेवणाच्या स्वच्छतेबाबत संस्थेचे धोरण कडक असल्याचे सांंगतले आहे.तर मेस व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराकडून काही चुक आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा एम्स मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नागपूरच्या एम्स मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी महाविद्यालय प्रशासनाला कळवले की, त्यांच्या पातळीवर अधिकृत तक्रार केलेली नाही. काही विद्यार्थ्यांनी मात्र मेसमधील मर्यादित जागा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाढणार्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनानेही एका काउंटरवर कर्मचारी नसल्याची बाब मान्य केली आहे. संबंधित कंत्राटदाराला तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे, तर एम्स महाविद्यालय प्रशासन अधिक चौकशी करत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा