दक्षिणात्र्य अभिनेत्रीने लिव्ह-इन पार्टनरचा काढला काटा; लोरी चालकाच्या प्रेमात पडून घडला अनर्थ

SHARE:

 

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहरात एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने आपल्याच लिव्ह-इन पार्टनरला वाटेतून दूर करण्यासाठी त्याचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉरी चालकाच्या प्रेमात पडल्यामुळे आणि त्याच्याशी विवाह करण्याच्या ओढीपोटी या अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ‘भजरंगी’ आणि ‘पोलीस क्वार्टर्स’ यांसारख्या चित्रपटांत काम केलेली अभिनेत्री बिंदू उर्फ उर्मिला ही गेल्या काही काळापासून ४० वर्षीय मोहन राव यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मोहन राव यांनी अभिनेत्री बिंदू सोबत राहण्यासाठी आपल्या पत्नीचाही त्याग केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात बिंदूची ओळख विनय नावाच्या एका लॉरी चालकाशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

​बिंदू आणि विनय यांनी भविष्यात एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आणि प्रेमाला मोहन राव यांचा कडाडून विरोध होता. मोहन राव हे बिंदूला आपल्यासोबतच राहण्यासाठी वारंवार भाग पाडत होते, जे बिंदू आणि विनय यांच्या लग्नातील सर्वात मोठा अडथळा ठरत होते. याच अडथळ्याला कायमचे दूर करण्यासाठी बिंदूने विनय आणि तिचा दुसरा सहकारी धनुष गौडा यांच्या मदतीने मोहन राव यांना संपवण्याचा कट रचला.
​ही घटना १८ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूच्या मंजुनाथ नगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्या रात्री आरोपींनी मोहन राव यांना मद्यपान करायला लावले. त्यानंतर संधी साधून त्यांनी मोहन राव यांच्यावर शस्त्राने वार केले. एवढेच नाही तर त्यांचा चेहरा प्लास्टिकच्या आवरणाने झाकून त्यांचा श्वास रोखत त्यांना जीवे मारले.

​उत्तर पश्चिम बेंगळुरूचे पोलीस उपायुक्त डी.एल. नागेश यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मोहन राव यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. तब्बल १२ दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून, अभिनेत्री बिंदू उर्फ उर्मिला, तिचा प्रियकर विनय आणि सहकारी धनुष गौडा या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःच्या सुखासाठी आणि लग्नातील अडथळा दूर करण्यासाठी एका व्यक्तीचा असा दुर्दैवी अंत केल्याच्या या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीत आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा