परभणी – भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र आले आहेत. परभणीमध्ये जिल्हा परिषदे सत्तेसाठी राष्ट्रवादीने मोठी खेळी खेळली आहे. भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष एकत्र आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी राजकीय खेळी केली आहे. परभणी जिल्ह्यात विविध पक्षांना एकत्र आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केला आहे.
या घडामोडींमुळे परभणी जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या १८ मार्च २०२६ रोजी होणार आहे. या पनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. राज्यात अधिवेशन सुरू आहे. प्रमुख नेते मुंबईत असल्याने परभणीत राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. परभणी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी २८ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे.
परभणी जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५४ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे २४ , राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ , उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ६ , एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५ , काँग्रेसचे ३ आणि १ अपक्ष सदस्य आहेत. सत्तास्थापनेसाठी २८ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. परभणीतील सर्व राजकीय पक्षांचा भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न चालला आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यापूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
यावेळी शिवसेनेला ही जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची ऑफर आली आहे. राष्ट्रवादीने शिंदे गटाच्या शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली आहे. त्याबदल्यात उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील, तर सभापतीपद उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला देण्याचे संभाव्य समीकरण ठरवण्यात आले असल्याची चर्चा आहे.
परभणीत या नव्या बदलासाठी राष्ट्रवादीने संख्याबळही एकत्र केले आहे. राष्ट्रवादीचे १५ , उद्धव ठाकरे गटाचे ६ , काँग्रेसचे २ आणि १ अपक्ष असे एकूण २४ सदस्य सध्या एका हॉटेलमध्ये थांबविल्याची माहिती समोर आली आहे. तर शिंदे गटाचे 5 सदस्य मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. हे सर्व सदस्य एकत्र आल्यास एकूण २९ सदस्यांचे संख्याबळ तयार होऊ शकते.




