नाशिकमध्ये १ कोटी २५ लाखांची लाच मागितल्या प्रकरणात २ अधिकार्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक

SHARE:

नाशिक – पाथर्डी फाटा येथे १ कोटी २५ लाखांची लाच मागितल्या प्रकरणात २ अधिकार्यांसह एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी सव्वा कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्यकर विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील वस्तू व सेवा कर जीएसटी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे जीएसटी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाशिक जीएसटी कार्यालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे आणि खासगी व्यक्ती अमित हिरामण जाधव यांना अटक करण्यात आली आहे. पागे हे नाशिकच्या दिंडोरी रोड परिसरातील म्हसरूळ येथे तर दोंदे हे नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या मागील भागात राहतात. जाधव हा नाशिक शहरामधील सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरातील रहिवासी आहे. माहितीनुसार, तक्रारदाराचे शहरातील दामोदर चौक परिसरात कार्यालय आहे. या कार्यालयावर संशयित अधिकाऱ्यांनी जीएसटी संदर्भात कारवाई केली होती.

या प्रकरणातील तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी राज्यकर उपायुक्त पागे आणि सहाय्यक आयुक्त दोंदे यांनी तक्रारदाराकडे १ कोटी २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणात तडजोडी अंती १ कोटी देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीच्या पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी तडजोड करत १ कोटी रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे उघड झाले आहे. त्यातील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

एसीबीच्या पथकाने पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात तक्रारदाराने २० लाख रुपयांची रक्कम दिल्यानंतर ती खासगी व्यक्ती अमित जाधव याने पागे आणि दोंदे यांच्या वतीने स्वीकारली आहे. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने अमित जाधवला पकडले आहे. त्यानंतर राज्यकर उपायुक्त पागे आणि सहाय्यक आयुक्त दोंदे यांनाही अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात ३ संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने वाहनांची व कार्यालयाची तपासणी केली आहे.

या वेळी सोमनाथ पागे यांच्या कार्यालयात २ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम पथकाने जप्त केली आहे. तसेच संशयित आरोपींचे मोबाईल फोन तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी ही धाड टाकण्यात आली आहे. अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. नाशिकमध्ये ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमूळे नाशिकमधील जीएसटी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तर यांमुळे राज्यातील सरकारी कार्यालयांतील ही मोठी भ्रष्टाचाराची घटना उघडकीस आली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा