नवी दिल्ली – जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सागरी वाहतुकीतील अडथळ्यांमुळे भारताच्या उद्योगधंद्याना फटका बसणार आहे. पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत पोहोचला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सागरी वाहतुकीतील अडथळयांमुळे भारताची साखर निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. याचा मोठा परिणाम देशांतर्गत बाजारावर होणार आहे. १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
युद्धाच्या ज्वाळांमुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीचे मार्ग असुरक्षित झाले आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने साखरेची निर्यात मंदावली आहे. मागील वर्षी सरकारने १० लाख टन निर्यातीचा कोटा दिला होता, त्यापैकी ८ लाख टन साखर निर्यात होऊ शकली होती. यावर्षी ही परिस्थिती त्याहूनही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी देशभरात २९५ ते ३०० लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर सध्या प्रति क्विंटल ३,६०० ते ३,७०० रुपये आहेत. गेल्या वर्षी याच काळात हे दर ४,५०० रुपयांपर्यंत होते. यामुळे दरातील घसरण दिसून येत आहे.
भारत देशातील साखरेची निर्यात न झाल्यामुळे साखर कारखान्यांकडे साठा पडून राहणार आहे. यामुळे कारखान्यांची तरलता कमी होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकण्याची शक्यता आहे. निर्यातीचे मार्ग लवकर मोकळे न झाल्यास भारत देशातील साखर कारखाने मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतात. यावर्षी निर्यात कोटा वाढवून २० लाख टन करण्यात आला आहे. तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीत युद्धामुळे मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात साखरेचा पुरवठा वाढल्यामुळे दरावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. देशात साखरेचा वार्षिक खप ३०० लाख टनांच्या आसपास होता.
या वर्षातील पहिल्या ६ महिन्यांतील विक्रीचा कल पाहता यावर्षी साखरेचा एकूण खप २७० लाख टनांच्या आसपास राहणार आहे. 6 महिन्यांच्या कालावधीत १३३ लाख टन साखर विक्री झाली आहे. पुढील काळात विक्री झाली तर वर्षभरातील खप २७० लाख टनांपर्यंत राहू शकतो, असे साखर क्षेत्रातील अभ्यासकांनी म्हटले आहे. भारतातील साखर उद्योगाला यावर्षी २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी आहे. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत ४ लाख टन साखरेचीच निर्यात झाली आहे. अगोदरच दर कमीच होते, त्यात आता युद्धाच्या परिणाम निर्यातीवर होणार आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धांचा परिणाम साखर उद्योगावरही होणार आहे. मध्य आशिया परिसरातील तणाव आणि सुएझ कालव्यातील वाहतुकीवरील परिणामामुळे आंतरराष्ट्रीय सामुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारत देशातील साखरेच्या निर्यातीला फटका बसला आहे, असे भारतातील साखर तज्ञांनी म्हटले आहे.




