ठाण्यामध्ये घरासाठी लाखो रूपये घेऊन बिल्डरकडून महिलांची फसवणूक; टिटवाळा पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल

SHARE:

ठाणे – घरासाठी लाखो रूपये घेऊन बिल्डरकडून महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ठाण्यामध्ये घरासाठी एका महिलेने 9 लाख भरले होते.तरी तिला अजून घर मिळालेले नाही. ठाण्यात महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला वाटते स्वतःचे घर असावे, या स्वप्नासाठी अनेक कुटुंबे आयुष्याची कमाई खर्च करतात. मात्र काही वेळा बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे किंवा फसवणुकीमुळे घर खरेदीदारांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागतात. ठाण्यातील टिटवाळा परिसरातही फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

अंधेरीतील एका महिलेने घरासाठी पैसे भरूनही ४ वर्षे उलटली तरी घराची नोंदणी न करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिल्डर आणि मध्यस्थाविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाहिद अंजुम वसीम शेख असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या मुंबईतील अंधेरीच्या मरोळ परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. काही वर्षांपूर्वी शेख कुटुंब नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात होते. त्यावेळी वसीम शेख यांचे मित्र प्रशांत शिरसाट यांनी अंबरनाथ येथील बिल्डर विवेक श्रीवास्तव यांचा टिटवाळा परिसरातील गृहप्रकल्प त्यांना दाखवला होता.

टिटवाळा परिसरातील आंबिवली गाळेगाव येथे सुरू असलेल्या या प्रकल्पात शेख कुटुंबाने २ बीएचके सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या घराची किंमत ३६ लाख रुपये होती. घराची नोंदणी करण्यासाठी शेख कुटुंबाने बिल्डरच्या खात्यात ९ लाख रुपये धनादेशाद्वारे जमा केले.या रकमेपैकी ५ लाख रुपयांच्या पावत्या बिल्डरने दिल्या आहेत. ४ लाख रुपयांच्या पावत्या मध्यस्थी व्यक्ती पंकज शिरसाठ यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्या पावत्या मागूनही मिळाल्या नसल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.

बिल्डरने या इमारतीचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर घराची नोंदणी करून दिली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या वेळेनंतरही घराची नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेकडून गृहकर्ज घेणेही शक्य होत नसल्याचे शेख यांनी सांगितले आहे. या प्रकल्पाबाबत अधिक माहिती काढल्यानंतर काही गंभीर बाबी शेख कुटुंबाच्या लक्षात आल्या आहेत. ठाण्यातील संबंधित गृहप्रकल्प नोंदणीकृत नसल्याची माहिती मिळाली आहे.

कागदपत्रांमध्ये आणि सहीमध्ये काही तफावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गाळेगाव येथील प्रकल्पाचे बांधकाम थांबलेले आहे. घराची नोंदणी होत नसल्यामुळे शेख कुटुंबाने बिल्डरकडे पैसे परत देण्याची मागणी केली होती. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. उलट बिल्डरने शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच मध्यस्थाकडूनही पावत्या देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे आपली फसवणूक झाली आहे, कळाल्यानंतर नाहिद शेख यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात बिल्डर आणि मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा