सुपारी देऊन शिक्षक पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड

SHARE:

बुलढाणा – जिल्ह्यात सुपारी देऊन शिक्षक पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघाताचा खोटा बहाणा करत व सुपारी देऊन आपल्या पत्नीची हत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात ही घटना घडली आहे. वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका होत्या.

पिंपळगाव काळे येथे शाळेवर जात असताना त्यांच्या स्कुटीला २ मार्च रोजी अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यामध्ये वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक याठिकाणी पोहोचले होते. तेव्हा पोलिसांनाही हा अपघात वाटला होता. चौकशी केली असता वृषाली गावंडे यांच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका बोलून दाखवली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्या आधारे पोलिसांकडून वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे.

मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा पती असलेला प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर या दोघांनी आपल्याला एक लाख रुपये सुपारी देऊन वृषाली गावंडे यांचा अपघात घडवून आणल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांकडून वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चहूळकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश जवळकर या दोघांनी टाटा पिकअप चालक असलेला मंगेश सूर्यवंशी याला एक लाख रुपये देऊन स्वतःच्याच पत्नीचा अपघात घडवून आणण्यास सांगितले होते.

२ मार्च रोजी सकाळच्या सुमारास शिक्षिका वृषाली गावंडे या शाळेवर आपल्या दुचाकीने जात असताना मंगेश सूर्यवंशी याने पातुर्डा ते कवठळमध्ये रस्त्यात वृषालीच्या दुचाकीला धडक मारून निघून गेला होता. जळगाव जामोद पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. याप्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता काल ३ आरोपीना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आपल्याच पत्नीची हत्या घडवून आणणाऱ्या पतीला जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी अटक केली आहे. याप्रकरणात अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा