
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे लक्ष वेधून ठेवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भाजप आणि जदयूच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने २४३ पैकी १0१ जागांवर उमेदवार उभे केले असून, विशेष म्हणजे भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी प्रथमच समान संख्येने जागांवर निवडणूक लढवली आहे. २0२0 च्या निवडणुकीत भाजप ७४ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा तर जेडीयू ४३ जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. दोन्ही पक्षांनी मिळून एनडीए सरकारची स्थापना केली होती. तसेच राष्ट्रीय जनता दलने १४३ जागा, काँग्रेसने ६१ जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने २0 जागा आणि विकसनशील इंसान पार्टीने १२ जागा लढवल्या. सध्याच्या कलांवर नजर टाकल्यास, एनडीए आघाडी २९१ जागांवर आघाडीवर असून महागठबंधन ३६ जागांवर पुढे आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केलाय.
अंबादास दानवे म्हणाले की, पराभव झालेला मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.




