
अंबरनाथ : शिवसेना उमेदवारांविरोधात खोट्या तक्रारींवर कारवाई करू नये, तसेच प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडू नये. शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथील सभेत पोलिस आणि प्रशासनाला दिला. शनिवारी अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ते येथे आले होते.
शनिवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर आणि अंबरनाथ येथे तीन जाहीर सभा घेतल्या. यात बदलापूर येथील सभेत बोलताना शिंदे यांनी विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. शिंदे पुढे म्हणाले की, बदलापूरच्या विकासाची गंगा गेल्या काही वर्षांत वाहू लागल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विरोधक बेचैन झाले आहेत. मात्र आगामी निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित आहे. बदलापूर म्हणजे दिघे साहेबांचा श्वास, बदलापूर म्हणजे बाळासाहेबांचा प्राण आणि बदलापूर म्हणजे फक्त धनुष्यबाण, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
किसन कथोरे यांना टोला
कोणी कितीही मारा गप्पा, पण निवडून येणार वामन आप्पा, असे सांगत शिंदे यांनी आमदार किसन कथोरे यांना टोला लगावला. काही लोक निधी घेऊन जातात पण काय करतात माहीत नाही पण वामन म्हात्रे एक एक रुपया कामासाठी खर्च करतो असे सांगत विरोधकांना उत्तर दिले. तसेच भाजपकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून शिवसेना उमेदवारांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी शिंदेंकडे दाखल झाल्याचे समजते. यावर बोलताना त्यांनी प्रशासनाला थेट सूचनाच दिली. ‘माझे पोलिसांशी कोणतेही वैर नाही. पण आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्यांना थारा देऊ नका’, असे ते म्हणाले.
विकासकामांची जंत्री
शिवसेनेच्या कारकीर्दीत बदलापूरमध्ये केलेल्या विकासकामांचा तपशीलही शिंदे यांनी उपस्थितांसमोर मांडला. शहरासाठी सुमारे ५०० कोटींचा विकासनिधी, २४० कोटींची पाणीपुरवठा योजना, प्रशासकीय इमारत, गावदेवी रोड, पंचवटी पूल, ॲडव्हान्स फायर सिस्टीमसाठी साडेतेरा कोटी रुपये, कचरा प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण, शिलाहार-पोशीर येथे नवे धरण उभारणार, उल्हासनदीवरील पूरनियंत्रण, मेट्रो व रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न आदी कामांचा त्यांनी उल्लेख केला. तसेच भविष्यात अंबरनाथचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. तसेच काशीच्या धरतीवर येथील प्राचीन शिवमंदिराचाही कॅरिडोरचे काम सुरू असून शहरात विविध विकासकामे शिवसेनेमुळे होत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तसेच अंबरनाथसाठी मेट्रो ५ आणि १४ चे काम वेगाने होणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
आम्ही आरोप आणि टीकेला नाही तर कामाला महत्व देत कामातून उत्तर दिले. संपत्तीहुन अधिक माणसे कमावली आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला म्हणून शेर सुद्धा म्हटला, ‘शिवसेना को हराना मुश्किलही नहीं, नामुनकीन है’.




