ईव्हीएमवर लक्ष ठेवा, दुबार मतदार आल्यास फोडून काढा, राज ठाकरेंचा शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांना आदेश

SHARE:

मुंबई – राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान रविवारी महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे म्हणाले कि ईव्हिएमवर लक्ष ठेवा, विधानसभा निवडणुकीत अनेक दुबार मतदारयाद्यांचा घोळ हा विरोधी पक्षाने समोर आणला होता. यावरही लक्ष ठेवा. दुबार मतदार आढळले तर त्याला जागेवर फोडून काढा असा थेट आदेश राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसैनिकांना दिला.

मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले कि माझं सगळ्यांना सांगणं आहे की बेसावध राहू नका. ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचे बीएलए सकाळी सहा वाजता मला मतदान केंद्रावर हवे आहेत. या सगळ्यांनी दुबार मतदारांबाबत सतर्क राहावे. अजिबात बेसावध राहू नका. एखादा दुबार मतदार तिकडे आला तर त्याला फोडून काढा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि मी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की, आता आपल्यात काहीच वाद नाही. आपण भांडत राहावे, हेच त्यांना वाटते. त्यांना जे हवं ते आपण होऊ द्यायचं नाही, आपल्याला हवं ते आपण घ्यायचं, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मी मराठी माणसाच्यादृष्टीने शेवटची निवडणूक आहे. आपली शहरं त्यांच्या ताब्यात गेली तर काही होऊ शकत नाही. असा इशारा त्यांनी दिला.

या निवडणुकीत तुम्हा मतदारांना राज्यकर्त्यांचा माज उतरवायचा आहे. ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, आजवर मराठा साम्राज्याने जो लढा दिला, तोच लढा आता आपल्याला मुंबई वाचवण्यासाठी द्यायचा आहे. ही मुंबई गुजरातला मिळून द्यायची नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या वचननाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, आम्ही उत्तम गोष्टी करू अरे पण त्यासाठी तुम्ही असले पाहिजे ना. तुमची काय किंमत करून ठेवली आहे? कोण महाराष्ट्रातील मराठी माणूस, पैसे फेकला की विकला जातो. ही बोली लावणारे कोण आमचेच, आमचेच लोकं त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या लोकांना फोडत आहेत. ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची आहे. आज चुकला तर कायमचा मुकला. उद्या राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर तक्रार कुणाकडे करायची? त्यामुळे हे सर्व सोडा, मराठी माणसासाठी एक व्हा, मुंबईसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा, असं आव्हान यावेळी राज ठाकरे यांनी केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, इतक्या वर्षाच्या तपश्चर्येने ही मुंबई मिळाली. १०7 हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेल्यावर पुतळ्यांना काय अर्थ उरतो? पुतळे काय म्हणतील आमचा मराठी माणूस बेसावध राहिला. आम्हाला सत्ता मिळाली तर काय करू, सत्तेला लाथा आम्ही मारल्यात. या सत्ताधाऱ्यांना लाथ मारायच्या आहेत. बेसावध राहू नका, ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. सहा वाजता मतदान केंद्रावर जा. आपल्यात वाद नाही, खरी लढाई त्यांच्याशी आहे. बेसावध राहू नका, सतर्क राहा, दुबार मतदार तिकडे आला तर सकाळी 7 वाजताच फोडून काढा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसैनिकांना दिला.

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की आम्ही मतदान केंद्रावरील आमच्या बीएलओंना सूचना दिल्या आहेत. मतदार यादीत लाल रंगाचे निशाण असलेला मतदार आला की, बाहेर ‘गोंद्या आला रे आला’, असा मेसेज द्या. दुबार मतदार दोन पायांवर चालत येईल, पण परत जाताना स्ट्रेचरवरुन जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

Leave a Comment

अधिक वाचा