संभाजीनगर – संभाजीनगरमध्ये पैसे वाटपावरून जोरदार राडा झाला आहे, तर माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यानी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. मला सकाळी चार वाजेपर्यंत फोन आले आहेत, भाजपाने संभाजीनगरमध्ये पैसे वाटले आहेत, असा अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केला आहे.
मतदानाला काही तास शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील पहाटे काही ठिकाणी पैसे वाटपाच्या आरोपावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आज (ता.१५ ) मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर नव्या याद्यांनुसार ११ लाख १८ हजार २६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, मतदानाला काही तास शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील काही ठिकाणी पैसे वाटपाच्या आरोपावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्यातील भाजपा सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
राज्यात भारतीय जनता पार्टीला पैशाची मस्ती आली आहे, सत्तेचा अहंकार वाढला आहे, सत्तेची नशा भाजपाच्या डोक्यात गेली आहे. अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये, मतदानाचा हक्क बजावला. यानंतर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आमचे मतदान निष्ठेचे आणि संघर्षाचे आहे. मला सकाळी चार वाजेपर्यंत फोन आले की, कशाप्रकारे भारतीय जनता पार्टीने पैशाचा पाऊस या शहरात पाडला. भारतीय जनता पार्टीला पैशाची मस्ती, पैशाचा माज आला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात, मग तुम्हाला पैसे का वाटावे लागतात, कामाच्या आधारावर मतदान मागितले पाहिजे, परंतु असे झालेले नाही. जनता सुज्ञ आहे, जनता निश्चितपणे भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल, अशी टीका यांनी भाजपावर सरकारवर केला आहे.
राज्यातील मतदारांनी योग्य व्यक्तींच्या बाजूने न्याय द्यायला हवा आहे, असे दानवे म्हणाले आहेत. राज्यातील प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. राज्यातील निवडणूक आयोग झोप घेत आहे. निवडणूक आयोग प्रक्रियेत कुठेच दिसत नाही. मतदारांनी सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी. एकांगी पद्धतीने प्रशासनाच्या दबावाखाली एका बाजूला एक न्याय आणि दुसर्या बाजूला दुसरा, न्याय होत असेल तर मतदारांनी योग्य व्यक्तींच्या बाजूने न्याय द्यायला हवा, असे म्हणत अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
राज्यात परिवर्तनाची आवश्यकता आहे. अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या राज्यात परिवर्तनाची आवश्यकता आहे. विकासाचा खोटा फुगा उभा केला जात आहे, तर राज्यात 2025 साली 1150 शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.




