परळी- मोफत मेट्रो आणि बससेवा देण्याची घोषणा केल्यानंतरही अजित पवार यांचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दारूण पराभव झाला. त्यांच्या पक्षाला केवळ २७ जागा मिळाला. तर भाजपने एकाहाती सत्ता मिळवली. या निकालावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. नासके लोकं सोबत ठेवल्यामुळे मराठ्यांनी त्यांना मत दिलं नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. परळीतील मिरवट येथे शनिवारी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले कि भाजपवाले कलाकार आहेत, त्यांनी बघायला काहीच ठेवले नाहीत सगळ्यांचा काटा काढला. अगोदर महाविकास आघाडी संपवली. आता एकनाथ शिंदे आणि अजित दादांचा काटा काढला.असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. अजित पवारांनी नासके लोक आपल्यासोबत ठेवल्यामुळे त्यांना मराठ्यांनी मत दिलं नाही. अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली. सन २०२९ च्या निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि दलित एक झाले तर भाजपाला चिरडतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
अजितदादा पण असे लोक सांभाळतात त्यामुळे लोक लांब चालले आहेत. त्यांना आता कळालं पापी लोकं रक्ताने माखलेले लोक सोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील. अजितदादांनी यातून तरी समज घेतली पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा त्यांना पडलं नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठ्यांचं मतदान अजित पवार यांना झालंच नाही. नाहीतर पुण्यात अजितदादांना इतकं कमी यश मिळालं नसतं मुसलमान, दलित, मराठा एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणूनच मी दलित, मुस्लिम मराठ्यांना सांगत असतो की यांना एकदा पायाखाली चेंगरा, २०२९ च्या निवडणुकीत होईल असं दिसत आहे. असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, अमलबजावणी झाली मात्र प्रमाणपत्र वाटप सुरू नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दिवस वेड्यात काढतात ते बघू? नुसता जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठा समाज तुम्हाला पाडू शकतो. महापालिकेत मिळालेल्या यशामुळे हवेत जाऊ नका, असा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला.




