सगळे घोटाळे फडणवीसांनी संपुष्टात आणले, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भूजबळाची एसीबीनंतर ईडीनेही निर्दोष मुक्तता केल्यानंतर अंजली दमानीयांचा आरोप

SHARE:

मुंबई – राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावरून अंजली दमानीया यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले आहेत, असा आरोप दमानीया यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.

दिल्लीत बांधलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. २०२१ मध्ये राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंदर्भात निर्दोष मुक्त केल्याने ईडीनेही या प्रकरणात दोषमुक्त करावे, अशी विनंती करणारा अर्ज भुजबळ कुटुंबीयांनी केला होता. तो मान्य करत न्यायालयाने छगन भुजबळांसह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांना दोषामुक्त केले.
त्यावरुन अंजली दमानिया म्हणाल्या कि छगन भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे, त्यांना कुठलीही क्लीन चीट मिळाली नसून आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच, छगन भुजबळांना मागच्या आणि आत्ताच्या दोन्ही सरकारने वाचवलं आहे. फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात आहेत, असा गंभीर आरोपही दमानिया यांनी केला.

छगन भुजबळांविरुद्ध २०१४ ला जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे. एकूण ११ घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे यासंदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती. तीन गुन्हे दाखल झाले, आतापर्यंत दोन गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळाला आहे, एक गुन्हा बाकी आहे. कोर्टाला योग्य ती माहिती न दिल्यामुळे गुन्हे रद्द केले असतील, मी मुख्य न्यायमूर्तींकडे यासंदर्भात पत्र लिहणार आहे. कलिना सेंट्रल लायब्ररीचं प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे, अद्याप छगन भुजबळांना क्लीन चीट नाही, आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं.

आता देशाच्या सरन्यायाधीश तसेच मुख्यमंत्र्यांना देखील मी पत्र लिहिणार आहे. मी या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार आहे. एसीबीने अपील करणं अपेक्षित होतं, मात्र सगळे एका माळेचे मणी आहेत. उद्धव ठाकरे सरकारने ३१ मार्च २०२२ ला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा शासन निर्णय काढला. एप्रिल २०२३ मध्ये पुन्हा एक शासन निर्णय काढून अपिलमध्ये जाण्याचा शासन निर्णय काढला. मात्र, महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं प्रकरण अद्याप संपल नाही. सगळ्या सरकारांनी त्यांना वाचवलं, आधी ठाकरेंनी वाचवलं मग फडणवीसांनी वाचवलं, असे म्हणत अंजली दमानियांनी दोन्ही सरकार भुजबळांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले आहेत. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. ईडीच्या आरोपपत्राचे सगळे पुरावे आहेत, प्रत्येकाचा जबाब दिला आहे, तरी असा निर्णय आला हे दुर्दैवी आहे. भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे, आधी आरोप करा त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावा आणि त्यांना पक्षात घ्या. फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता आणि आज हेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात आहेत. सध्या राज्यात केवळ बोली लावण्याचं राजकारण सुरू आहे, असे म्हणत दमानिया यांनी फडणवीसांनाही लक्ष केले.

Leave a Comment

अधिक वाचा