तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयचा महत्त्वाचा निष्कर्ष, प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ नसल्याचे सिद्ध

SHARE:

नेल्लोर – तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयचा महत्त्वाचा निष्कर्ष आला आहे, तर प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ नसल्याचे सिद्ध झाले आहे. तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. लाडूमध्ये ’बीफ टॅलो’ किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने अंतिम आरोपपत्र सादर केले आहे. या तपास अहवालात सीबीआयने अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष नोंदवला आहे. २०१९ ते २०२४ या काळात तिरुपती प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या तुपात गायीची चरबी किंवा डुकराची चरबी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

२०२४ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिरुपती लाडूमध्ये ’प्राण्यांची चरबी’ वापरली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. सीबीआयचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. २३  जानेवारी रोजी नेल्लोर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १६ महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ नसल्याचे सिद्ध केले आहे, ज्यामुळे हा वाद आता थांबणार आहे.

तिरूपतीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी नसल्याचे समोर आल्यावर, आंध्रप्रदेश राज्यातील वायएसआर काँग्रेसने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “खोट्या प्रचाराबद्दल“ या दोन्ही नेत्यांनी माजी मुख्यमंत्री वाय.एस. आर जगन मोहन रेड्डी यांची माफी मागावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी दिल्लीत बोलताना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

“तिरुमला हे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आध्यात्मिक केंद्र आहे, ते राजकारणाचे व्यासपीठ नाही. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या मंदिराचे राजकारण करून लोकांची दिशाभूल केली आहे, त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे,“ असे माजी मुख्यमंत्री वाय.एस. आर जगन मोहन रेड्डी म्हणाले. गेल्या १६ महिन्यांपासून तिरुपती लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा जो दावा केला जात होता, तो सीबीआयच्या आरोपपत्रामुळे खोटा ठरला आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असलेल्या सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना चपराक बसली आहे, असे वायएसआरसीपीचे नेत्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा