पालघर – देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटल्यानंतरही राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. विकासाचे मोठ मोठे दावे करत असताना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातून समोर आलेली एक हृदयद्रावक घटना ही विकासाच्या दाव्याची पोल खोल करत आहे. कारण कि रस्ता नसल्यामुळे एका 18 वर्षांच्या तरूणाला आपला जीव गमवावा लागला. शैलेश मगन वागदादा असे तरूणाचे नाव आहे. ही घटना पालघर जिल्हयातील जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा) गावात घडली. याचा वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी होता. मंगळवारी सकाळी (४ फेब्रुवारी) त्याची प्रकृती अचानक बिकट झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज होती, परंतु गावाकडे जाणारा पक्का रस्ता नाही. सुमारे ४ किलोमीटरच्या खडबडीत आणि डोंगराळ प्रदेशामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचणे अशक्य झाले.
हताश होऊन, कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी लाकूड आणि कापड वापरून झोळी तयार केली आणि शैलेशला खांद्यावर घेऊन मुख्य रस्त्यावर खडकाळ रस्त्याने चालत गेले. त्याला डोंगर ओलांडून आरोग्य केंद्रात नेण्यात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पालघर जिल्ह्यातील तिलोंडा गाव हा आदिवासीबहुल भाग आहे, जिथे रस्ते, वीज आणि आरोग्यसेवा यासारख्या मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुसळधार पावसामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. जर कोणी आजारी पडले तर त्याला रुग्णालयात नेणे म्हणजे मृत्यूशी झुंज देण्यासारखे आहे.
या घटनेनंतर, संपूर्ण परिसरात प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की त्यांनी रस्ते बांधणीसाठी, ग्रामप्रमुख आणि संबंधित सरकारी विभागांना असंख्य अर्ज सादर केले, परंतु प्रत्येक वेळी त्यांना फक्त आश्वासने मिळाली. असे अधिक जीव गेल्यावरच सरकार आणि प्रशासन जागे होईल का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
माहित असावे कि पालघरमधील ही घटना पहिलीच वेळ नाही. रुग्णालयात जाताना वाटेतच गर्भवती महिला आणि रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डिजिटल इंडिया आणि विकसित महाराष्ट्राच्या गप्पा मारणार्या महायूती सरकारच्या काळात रस्त्याअभावी झोळीत मरणारे हे जीव सरकारच्या अपयशावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. महायुती सरकारच्या काळात, चांगला रस्ता नसल्यामुळे आणि रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. ज्यामुळे प्रशासनाचे अपयश उघड होते.




