मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटना मतदान यंत्र ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे तर गेल्या जवळपास गेल्या १५ वर्षांपासून आजही ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे. असे असताना भाजप मात्र ईव्हीएमचं समर्थन करत आहे. आता भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास लोकांच्या शंका दूर होतील, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
शनिवारी काही जिल्हयात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान अनेक ठिकाणी ईव्हिएम बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जामगे येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. या दरम्यान ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडत असल्याने रामदास कदम यांचा संताप अनावर झाला. मताधिकार बजावल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना निवडणूक यंत्रणेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदान यंत्रणा नीटपणे हाताळता येत नसेल, तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. आज घडलेल्या सर्व घटनांची मी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.
ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर मशीन नीट चालत नसतील तर यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. मतदान यंत्रांबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्यास या शंका दूर होतील, असेही ते म्हणाले. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर मला कोणतीही अडचण नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची निवडणुका घेण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.





