‘बिग बॉस मराठी – ६’ मधून ओंकार राऊतचा पत्ता कट; चौथ्या आठवड्यात रितेश देशमुखने दाखवला बाहेरचा रस्ता!

SHARE:

मनोरंजन – ‘बिग बॉस मराठी’ च्या सहाव्या पर्वामध्ये सध्या रोज नवनवीन वळणे पाहायला मिळत आहेत. खेळातील चुरस दिवसेंदिवस वाढत असतानाच, चौथ्या आठवड्यात एका लोकप्रिय स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता ओंकार राऊत या आठवड्यात एलिमिनेट झाला असून त्याचा या घरातील प्रवास आता थांबला आहे. ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुखने ही घोषणा केली.

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. रितेश देशमुखने सदस्यांच्या वागणुकीवर आणि खेळातील हलगर्जीपणावर जोरदार ताशेरे ओढले. खेळाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सदस्यांची रितेशने कडक शब्दांत शाळा घेतली. नियमांच्या याच उल्लंघनामुळे बिग बॉसने या वेळी ‘डबल एव्हिक्शन’ जाहीर केले होते, ज्याचा पहिला फटका ओंकार राऊतला बसला. रितेशने स्पष्ट केले की, वारंवार सूचना देऊन आणि चुका समजावून सांगूनही ओंकारला आपल्या खेळात प्रभावी बदल करता आला नाही, ज्यामुळे त्याला ही किंमत मोजावी लागली.

कार्यक्रमात मनोरंजन आणि वादाचे मिश्रण असणारे विविध टास्क पार पडले. यात ‘पॉपड टास्क’बद्दल चर्चा झाली, तसेच ‘गाणे डेडिकेट करणे’ आणि ‘वस्तूंचे वैशिष्ट्य सांगून त्या योग्य व्यक्तीला देणे’ यांसारखे मजेदार पण बोचरे टास्क पार पडले. या दरम्यान सदस्यांमधील अंतर्गत कलह समोर आले. सचिनने तन्वीला ‘डमरू’ दिले, तर अनुश्री आणि राकेश यांनी ‘माचीस’ देऊन करण व दीपालीवर निशाणा साधला. तसेच, ‘पंचिंग बॅग’ टास्कमध्ये तन्वी आणि आयुष यांच्यातील वाद चांगलाच रंगला. आयुष आपल्याशी बोलत नसल्याची तक्रार करत तन्वीने आपला राग व्यक्त केला.

ओंकार राऊतने ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या कार्यक्रमातून घराघरात ओळख निर्माण केली होती. बिग बॉसच्या घरात तो एक संयमी खेळाडू म्हणून वावरत होता, मात्र खेळातील आक्रमकता आणि सक्रियतेच्या कमतरतेमुळे तो प्रेक्षकांची मते मिळवण्यात मागे पडला. त्याच्या एक्झिटमुळे घरातील इतर सदस्यांनाही आता आपल्या खेळाबद्दल गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. चौथ्या आठवड्यातील हे एलिमिनेशन प्रेक्षकांसाठी अनपेक्षित ठरले असून, ओंकारचा बिग बॉसच्या घरातील प्रवास अखेर संपला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा