तेलंगणात राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; छगन भूजबळ यांची कठोर कारवाईची मागणी

SHARE:

मुंबई – राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्याबाबत उच्च जातीच्या लोकांमध्ये किती घृणा आहे, हे एका घटनेवरून समोर आले आहे. ही घटना म्हणजे तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात ७  फेब्रुवारी २०२६ रोजी दिवसाढवळ्या राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेवरून बहुजन समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेचा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र निषेध केला असून दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आणि दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. भुजबळ यांनी म्हटले आहे की महात्मा फुले यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या घटना पुरोगामी सामाजिक विचारसरणीवर हल्ला आहेत. लोकशाही समाजात ही कृत्ये सहन केली जाऊ शकत नाहीत. छगन भुजबळ यांनी या घटनेचे वर्णन सामाजिक सुधारणेच्या विचारसरणीवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला असल्याचे केले आहे.
भुजबळ यांनी हा केवळ एका पुतळ्यावरील हल्ला नसून सामाजिक समता आणि संवैधानिक मूल्यांवर थेट हल्ला असल्याचे वर्णन केले. त्यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्र सरकारने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा आणि दोषींना, पाताळातही, शोधून त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली. ते म्हणाले कि आरोपींना अशी शिक्षा द्यावी, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.

भुजबळ यांनी पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे नुकसान करणे हे निंदनीय आणि भ्याड कृत्य आहे. यामुळे त्यांच्या लाखो अनुयायांच्या भावना दुखावल्या जातात. काही समाजविरोधी घटक अजूनही सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या प्रतीकांना घाबरतात, म्हणूनच ते अशा घृणास्पद कृत्यांचा अवलंब करतात. हा हल्ला मानवतावादी विचारसरणीला चिरडण्याचे षड्यंत्र आहे, जे कोणत्याही किंमतीत सहन केले जाऊ शकत नाही. समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना सोडले जाऊ नये.

उत्तर प्रदेशातील नगीना येथील खासदार चंद्रशेखर आझाद यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. ट्विटरवर घटनेचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिवसाढवळ्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर झालेला हल्ला केवळ भ्याडपणाचा आणि गुन्हेगारीचा नाही तर लाखो अनुयायांच्या आणि मानवतावादी विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाच्या भावनांवर थेट हल्ला आहे.

चंद्रशेखर आझाद म्हणाले की, राष्ट्रपिता फुले हे महापुरुष आहेत. ज्यांनी 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा उघडली आणि पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळवला. राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे बाळकडू पाजले. त्यांनी सती प्रथा, बालविवाह आणि विधवा अत्याचाराविरुद्ध लढा दिला. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेला पाप म्हणत शूद्रांच्या गुलामगिरीविरुद्ध क्रांतीचे आवाहन केले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातविरहित समाजाचा पाया घातला. दलित, महिला, मागासवर्गीय, शेतकरी आणि मजूर यांना संघटित आणि जागृत केले.

ते म्हणाले की, या घटनेवरून स्पष्ट होते की पुरुषप्रधान आणि जातीयवादी विचारसरणी अजूनही महिला मुक्ती, शिक्षण आणि शूद्र उन्नतीच्या प्रतीकांना घाबरते. आमचा प्रश्न आहे कि महिलांना शिक्षित करणे हा गुन्हा आहे का? जातीयतेला विरोध करणे हा गुन्हा आहे का? बहुजन इतिहास आणि महापुरुषांचा आदर अजूनही असह्य आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार खासदार चंद्रशेखर आझाद यांनी ब्राह्मणवादी विचारसणीच्या लोकांना केला. याशिवाय या घटनेकडे सामाजिक समता आणि पुरोगामी विचारांवर थेट हल्ला म्हणून पाहिले जात आहे. या घटनेमुळे देशातील महापुरुषांच्या वारशाच्या संरक्षणाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा