मुंबईमध्ये सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण

SHARE:

मुंबई – सावकाराची गुंडागर्दी वाढली आहे, तर व्याजाचे पैसे न दिल्याने एका तरुणाचे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली आहे. मुंबईतील उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. एका तरूणाला लॉजमध्ये मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबईतील उल्हासनगरमध्ये ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये सावकाराच्या गुंडागर्दीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्याजाने दिलेले पैसे वेळेत न मिळाल्याच्या कारणावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.व्याजाने दिलेले पैसे वेळेत न मिळाल्याच्या कारणावरून एका सावकाराने भरदिवसा चायनीज सेंटरमध्ये घुसून ३० वर्षीय तरुणाचे अपहरण केले होते.

त्यानंतर त्याला बेदम मारहाण करत लॉजमध्ये डांबून अर्ध नग्न अवस्थेत व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. तसेच चाकूच्या धाक दाखवून छळ केला आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५  परिसरात घडली आहे. हिल लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चिराग मीरचंदानी अंबरनाथ पूर्व येथील आश्रय आनंद इमारत येथे कुटुंबासह राहतात. त्यांनी आरोपी सावकार अमित चागुला याच्याकडून ४ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी २  लाख ५० हजार रुपये त्यांनी परत केले होते. मात्र आरोपी ४  लाख ५० हजार रुपयांची मागणी करत होता.

वाढत्या व्याजामुळे बाकीची रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी तरूणाला मारहाण केली आहे. ९  फेब्रुवारी २०२६ च्या रात्री, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5५  येथील एका चायनीज सेंटरमध्ये जेवत असताना आरोपींनी लोखंडी पाइपने चिराग यांना मारहाण केली आहे. त्यानंतर जबरदस्तीने कारमध्ये बसवून बदलापूर येथील एका कार्यालयात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. पुढे त्यांना माथेरान येथे नेऊन एका लॉजमध्ये कोंडून ठेवण्यात आले. तेथे नग्न करून मारहाण करत व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

तसेच त्यांच्या बहिणीबाबत अश्लील वक्तव्य करत पैशांची मागणी करण्यात आली आहे. अखेरीस, आरोपींच्या सांगण्यावरून कैलाश नगर परिसरातील एका व्यक्तीकडे १  लाख २५ हजार रुपये जमा केल्यानंतर चिराग यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अमित चागुला, कमल नागदेव आणि त्यांच्या २ साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील सर्व आरोपी पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात अधिक तपास मुंबई पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा