दुर्ग – छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात अफू लागवडीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जीवरा सिरसा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सामोदा गावात जवळपास ७ एकरात अफूची बेकायदेशीरपणे शेती केली जात होती. शिवनाथ नदीच्या काठावरील जमिनीवर ही शेती केली जात होती. या प्रकरणी भाजप नेते विनायक ताम्राकर आणि ब्रिजेश ताम्राकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत सिंह यांनीही घटनास्थळी पोहोचून अफूच्या रोपांची पाहणी केली. यावेळ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. अफूच्या रोपांची मोजणी केली. याशिवाय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीचे मोजमाप केले. आणखी काही बेकायदेशीर लागवड आहे का हे शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात ड्रोनचा वापर करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीचे दोन सदस्यीय पथकही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कागदपत्रे आणि वनस्पतींचे नमुने गोळा केले. अधिकारी म्हणाले की ही मोठ्या प्रमाणात अफूची लागवड होती आणि ती थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या मते, तपासात असेही उघड झाले आहे की या जमिनीवर बऱ्याच काळापासून बेकायदेशीर शेती सुरू होती. पुढील कारवाईत कोणतीही चूक होऊ नये यासाठी सर्व वनस्पती आणि जमिनीच्या नोंदी संकलित केल्या जात आहेत. भाजप नेते विनायक ताम्रकर आणि इतर दोघांची चौकशी केली जात आहे. या बेकायदेशीर शेतीत आणखी कोण सामील आहे आणि त्यामागे मोठे नेटवर्क कार्यरत होते का, याचाही पोलिस तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल घटनास्थळी पोहोचले आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. भूपेश बघेल म्हणाले की दुर्गमधील सामोदा गावात असलेले हे शेत भाजप नेते विनायक ताम्रकर यांचे आहे. भूपेश बघेल यांनी दावा केला की भाजप किसान मोर्चाचे नेते विनायक ताम्रकर दुर्ग जिल्ह्यातील सामोदा गावात १० एकर शेतात अफूची लागवड करत आहेत. विनायक ताम्रकर हे खूप प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगितले जाते. त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांशी संबंध आहे. प्रश्न असा आहे कीः हा प्रकल्प भाजप किसान मोर्चाचा आहे की मंत्र्यांचा? असा प्रश्न बघेल यांनी उपस्थित केला.




