टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव

SHARE:

खेळ : टीम इंडियाने न्यूझीलंडवर सांघिक कामगिराच्या जोरावर दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर ९६ धावांच्या एकतर्फी फरकाने मात करत आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचं विक्रमी आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला पूर्ण २० ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला १९ ओव्हरमध्ये १५९ रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात टी-२० वर्ल्ड कप जिंकला. तसेच भारताची ही टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याची सलग दुसरी तर एकूण तिसरी वेळ ठरली. भारताने २०२४ साली रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर मात करत १७ वर्षांनंतर पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्याआधी महेंद्रसिंह धोनी याने भारताला २००७ साली पहिल्याच झटक्यात ही ट्रॉफी जिंकून दिली होती.

टीम इंडियाची बॅटिंग
न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचा फायदा घेत न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर रचला. भारताने २०  ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून २५५ धावांचा डोंगर उभा केला. भारतासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक ८९  धावा केल्या. इशान किशन याने ५४ तर अभिषेक शर्मा याने ५२ धावांचं योगदान दिलं.

हार्दिक पंड्या १८ धावांवर बाद झाला. तर अखेरच्या क्षणी शिवम दुबे याने फटकेबाजी करत फिनिशिंग टच दिला. शिवमने २० व्या ओव्हरमध्ये एकट्याने २४ धावा करत एकूण आणि नाबाद २६ धावा केल्या. तर तिलकने नॉट आऊट ८ रन्स केल्या. न्यूझीलंडसाठी जेम्स निशाम याने सर्वाधिक ३  विकेट्स मिळवल्या. तर मॅट हेन्री आणि रचीन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी १-१  विकेट मिळवली.

बुमराहचा चौकार
न्यूझीलंडच्या ३  फलंदाजांनाच विजयी धावांचा पाठलाग करताना दुहेरी आकडा गाठता आला. न्यूझीलंडसाठी ओपनर टीम सायफर्ट याने याने अर्धशतकी खेळी करुन न्यूझीलंडला सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र डोंगराएवढ्या धावसंख्येसमोर फिनचा हा प्रयत्न प्रयत्नच ठरला. टीमने २६ बॉलमध्ये सर्वाधिक ५२ रन्स केल्या. कॅप्टन मिचेल सँटनर याने ४३ धावांचं योगदान दिलं. तर डॅरेल मिचेल याने १७ धावा जोडल्या. तर इतरांना भारतीय गोलंदाजांसमोर दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक ४  विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी १-१  विकेट मिळवली.

टीम इंडियाचा २०२४ पासून टी-२० वर्ल्ड कपमधील १६ वा विजय
भारताचा हा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील २०२४ पासूनचा १७ वा सामना होता. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत २०२४ पासून १६ वा विजय मिळवला. तर भारताने एकमेव सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर ८  फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गमावला.

भारत टी 20i वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी संघ
टीम इंडियाचा हा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हा ६१ वा सामना होता. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत ६१ सामन्यांमधील ४५  वा विजय मिळवला.

Leave a Comment

अधिक वाचा