शेतकऱ्यांवर भयंकर संकट, थेट येणार उष्णतेची लाट…हवामान अंदाजाने चिंता वाढली!

SHARE:

हवामान : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पारा रोजच तापतो आहे. पुढच्या काही दिवसांत मुंबईत उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यभरात तापमानात वाढ होणार आहे.

राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, नागपूरपासून ते जळगाव, कोल्हापूरपर्यंत सर्वच जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे. सोलापुरात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. तर नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाचा पारा वाढला असून दुपारी चटके लागायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने तर मुंबईत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचेही आवाहन केले जात आहे.

मुंबईत उष्णतेची लाट
पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत हवामान उष्ण राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले असले होते. यामध्ये सोमवारी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये येत्या ११ मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून १२ आणि १३ तारखेला तापमान किंचित खाली येईल. तर रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरात कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

राज्यभरात पारा तापला, नागरिकांचे हाल
बुलडाणा जिल्ह्याचे तापमानही आज ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यामुळे रस्त्यावर पूर्णतः शुकशुकाट पसरला आहे. नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत असल्याने नागरिक थंड पेय मिळेल त्या ठिकाणी जात आहेत. सोलापूरच्या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या वर गेला आहे. रायगडच्या माणगावमध्ये पारा ४१ अंशाच्याही पुढे गेला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाचा पारा वाढला असून दुपारी चटके लागायला सुरुवात झाली आहे. सध्या नागपुरातील तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर असून अकोल्यात तापमान ४० अंशाच्याही पुढे गेले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमान झपाट्याने वाढत आहे. सोलापुरातही तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. सोलापुरात यंदाच्या हंगामातील सर्वात उच्चांकि तापमानाची नोंद काल झाली आहे. काल सोलापुरात ४०.२ अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला होता.

शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता
दुसरीडे थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात हिवाळ्यात किमान तापमान ४.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्याची नोंद झाली होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच शेती पिकांवर होण्याची शक्यता आहे. गहू, भाजीपाला आणि फळबागा या शेती पिकांना वाढत्या उन्हाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळेच पिकांवर ताण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे, मल्चिंग अथवा अच्छादनाचा वापर करणे तसेच खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. भरत मालुंजकर यांनी केले आहे. दरम्यान, आगामी दिवसांत तापमानाचा पारा आणखी उंचावणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा