बीड– जिल्ह्यात परळी येथील बाजारपेठेत तरुणावर रॉड आणि पाईपने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बीड जिल्ह्यातील परळी शहरात भर बाजारात एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणात 5 जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, परळी शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या एका युवकाला काही जणांनी अडवले. तू आमच्या विरोधात काम का केलेस, असे म्हणत काही आरोपींनी त्याच्याशी वाद घातला, त्यानंतर त्या पाच जणांच्या टोळक्याने युवकाला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली आहे. ही घटना परळी बाजारपेठेत घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मारहाणीचा प्रकार पाहताच आसपासच्या नागरिकांनी धाव घेत जखमी युवकाची सुटका केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेख हशब, शेख हाफिज, शेख शोफुला, शेख साकेब आणि शेख आलिम या 5 जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास परळी शहर पोलीस करत आहेत



