वर्धा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जलजीवन मिशन’ च्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजही देशातील अनेक भागात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. आता असाच एक प्रकार वर्धा जिल्हयातून समोर आला आहे. येथे काही दिवस पाणी मिळाल्यानंतर नळ योजना दीड वर्षांपासून बंद पडली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही वेड्यात गावातील हा प्रकार आहे.
कोल्ही गावात तसेच जवळपासच्या बेड्यात (पारधी वस्ती) जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरासमोर एक नळ देण्यात आले. काही दिवस नळातून पाणी मिळाले. आता गेले दीड वर्षांपासून नळ योजना पूर्णपणे ठप्प पडली असून लाखो रुपये खर्च करून प्रत्येक घरासमोर उभारण्यात आलेल्या नळातून पाण्याचा थेंबही गावकऱ्यांना मिळालेला नाही.
दरम्यान गावकऱ्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत बंद पडलेली पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेला पत्र दिले आहे. मात्र, गेले दीड वर्षांपासून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
सरकारद्वारे ‘हर घर जल’च्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसातच कोल्ही वेड्यातील ही परिस्थिती मात्र प्रशासकीय उदासिनतेचा कळस ठरत आहे. लाखो रुपये खर्चूनही जर गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल आणि पुन्हा पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत असेल, तर या भ्रष्ट कारभाराची चौकशी होणार? असा संतप्त सवाल आता गावकरी उपस्थित करत आहेत.
ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे हजारो कोटी रुपये खर्च झाले. मात्र, अनेक गाव आणि वस्त्या अशा आहेत, जिथे योजना राबवल्यानंतर काही दिवसात नळ कोरडे झाले आहे.
संपूर्ण देशभरच अशी स्थिती नाही तर खुद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्र वाराणसी शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या नायपुरकालन, नरोत्तमपूर आणि सिंधोरा गावांमध्ये अशीच स्थिती आहे. नैपुरकला गावातील मोठ्या संख्येने लोक अजूनही पाण्याची वाट पाहत आहेत. या गावात प्रत्येक घरात शुद्ध नळाचे पाणी पोहोचवण्यासाठी सुमारे 9 महिन्यांपूर्वी एक पाईपलाईन टाकण्यात आली आणि घराबाहेर निळ्या रंगाचे पाईप बसवण्यात आले, परंतु आजही लोक या पाईपमध्ये पाणी येण्याची वाट पाहत आहेत.





