तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅस बंद होईल; छगन भुजबळांचं लोकांची चिंता वाढवणारं वक्तव्य

SHARE:

मुंबई – एकीकडे आखाती देशात युद्धामुळे भारत एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. देशभरात गॅस एजेंसीच्या समोर गॅससाठी लोकांचा रांगा पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे केंद्र सरकार, मंत्री भाजप नेते आणि राज्यातील महायूती सरकार म्हणत आहे कि राज्यात गॅसचा तुटवडा नाही. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. तीन महिन्यानंतर कदाचित एलपीजी गॅस बंद होईल, असं लोकांची चिंता वाढणारं वक्तव्य राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी शनिवारी केलं आहे. एलपीजी गॅसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्र सरकारकडून एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित होते. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या सचिवांना आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलवण्यात आले होते. या बैठकीत एलपीजी गॅस टंचाईवर चर्चा करण्यात आली. तसेच देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक राज्याचे मंत्री आणि सेक्रेटरींनी या बैठकीत काही सूचना केल्या.

आपण केंद्र सरकारला सांगितले की पीएनजी गॅस सध्या स्वस्त पडत आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. त्याचा जास्त प्रसार झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या एका पत्रकात तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल, असा उल्लेख होता. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करुन घेतल्या पाहिजेत, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केले आहे, त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, पीएनजी जोडण्या लवकर करायच्या आहेत. पाइपलाइन टाकण्यासाठी विविध विभागांत परवानग्या मागितल्या जातात. पीएनजी साठीची परवानगी मिळाली, या परवानग्या 24 तासांत दिल्या जातील. पीएनजी काम करणाऱ्यांना २४ तास परवानगी राहील, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
जिथे जिथे यासंदर्भात काम करणे शक्य आहे तिथे सुरु केले पाहिजे. सगळ्या नगरपालिकांनी पीएनजीच्या जोडण्या वाढवल्या पाहिजे. पाण्याचं आणि वीजेचं कनेक्शन असल्यावरच इमारतींना ओसी दिला जातो, त्याप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनच्या सक्तीची अट टाकली पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

राज्यात केरोसीन उपलब्ध असताना आपण ते देऊ शकत नव्हतो. कारण हायकोर्टाने त्यावेळी एक आदेश दिला होता. आता आपण न्यायालयाला कळवले आहे. साडेतीन हजार लिटर केरोसीन राज्यात उपलब्ध आहे. जिथे एलपीजी, पीएनजी कमी आहेत त्यांना केरोसीन वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. जे जुने डिलर्स होते, त्यांचे रिन्युअल वगैरे प्रलंबित आहे, तिथे काम झालं असं समजावं आणि कामाला लागा. पेट्रोल पंपावर केरोसीन टँकर ठेवून तिथे मिळेल अशी व्यवस्था करु, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

अमेरिका- इस्रायल आणि ईराणमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेऊन राहीलेलं नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कदाचित परिस्थिती आणखी भीषण बनू शकते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याने नागरिकांची चिंता वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा