चंद्रपूर – नोकरीसाठी एका मुलीनेच जन्मदात्या पित्याला ठार मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. अनुकंपा नोकरीसाठी पोटच्या पोरीनेच जन्मदात्या पित्याला मिल्कशेकमधून विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्याचा उलगडा त्या मुलीच्या प्रियकरानेच केला आहे. एका मुलीने जन्मदात्या पित्याचा सूडबुद्धीने खुन केल्याने पोलीस दल ही हादरून गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून माणुसकीला आणि रक्ताच्या नात्यालाही काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
स्वतःच्या वडिलांच्या निधनानंतर मिळणाऱ्या अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या हव्यासापोटी एका मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या पित्याला विष देऊन ठार मारल्याचे प्रकरण समोर आले झाले आहे. पोलीस खात्यात वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी एका मुलीने हा कारनामा केला आहे. चंद्रपुरात ही घटना घडली आहे. आर्या जयंत बाल्लावार असे या पोलीस कन्येचे नाव आहे. त्या मुलीने २४ मार्च २०२३ रोजी वडील जयंत बाल्लावार यांना मिल्कशेक मधून विष देऊन त्यांची हत्या केली होती.
या खुनानंतर २ महिन्यात ती वडिलांच्या जागी पोलीस दलात रुजूही झाली होती. मात्र, वर्षभरानंतर प्रियकरानेच या सगळ्या प्रकाराचे पुरावे पोलिसांना दिले आहेत. आणि हा हत्येचा प्रकार उघड झाला आहे. आर्या बाल्लावार आणि आशिष शेडमाके यांचे प्रेमसंबंध होते. आशिषचे वडीलही पोलीस दलात होते, त्यांच्या निधनानंतर आशिषला २ महिन्यात अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. हीच शॉर्टकट आयडिया आर्या बाल्लावारने केली. तिचे वडीलही पोलीस दलात होते.
तिने आशिषच्या मदतीने वडिलांची हत्या करण्याचा कट रचला. २४ मार्च २०२३ रोजी आर्याने वडिलांना विषारी मिल्कशेक दिला. ड्युटीवर गेल्यावर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी हा मृत्यू नैसर्गिक वाटला, पण तो एक सुनियोजित खुन होता. वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या बाल्लावार पोलीस दलात भरती झाली. आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार दोघांचे प्रशिक्षण एकत्र सुरू झाले. मात्र प्रशिक्षणावरून परतल्यानंतर आशिष शेडमाकेला एका गंभीर गुन्ह्यात पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते.
आशिष शेडमाकेची नोकरी जाताच आया बाल्लावारने त्याच्याशी संबंध तोडले होते. स्वतःच्या नोकरीसाठी जन्मदात्या पित्याचा खून करायला लावणाऱ्या प्रेयसीने आपला अपमान केल्याचा राग त्याच्या मनात होता. आशिष शेडमाकेला हा अपमान सहन झाला नाही. त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन खुनाचे चित्रीकरण, मोबाईलवरील संभाषण आणि सर्व पुरावे सादर केले. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या पुराव्यांची गंभीर दखल घेऊन आर्या बाल्लावारला अटक करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी चौकशी केली असता आर्या बाल्लावारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रामनगर पोलीस ठाण्यात आशिष शेडमाके, आर्या बाल्लावार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध ३०२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलीने नोकरीसाठी जन्मदात्या वडिलांना ठार मारले, या घटनेने संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, व या घटनेमुळे परिसरातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास चंद्रपुर पोलिस करत आहेत.





