रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद, रुग्णाच्या जिवाशी खेळ; सरकारी दाव्यांची पोल उघड

SHARE:

पालघर – महायुती सरकार आरोग्यसेवा मजबूत करण्याबाबत मोठे दावे करत असली तरी आदिवासी जिल्ह्यांमधील जमिनी वास्तव वेगळेच आहे. पालघरमधील घटनेने सरकारच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोल उघड झाली आहे. १०८ रुग्णवाहिका वाटेतच बंद तेव्हा या अयशस्वी व्यवस्थेचा भीषण चेहरा समोर आला. एक रुग्ण दीड तास यातना सहन करत राहिला. परंतू दुसरी रुग्णवाहिका वेळेवर आली नाही. यामुळे रुग्णाचे हाल झाले.

राज्यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात आणि महामार्गावर रुग्णाला तातडीने उपचार मिळावे म्हणून राज्य सरकारने १०८ सेवा सुरू केली. मात्र गेल्या अनेक वर्षापासून १०८ रुग्णसेवेबाबत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे या रुग्णवाहिका कुठेही बंद पडतात. दरम्यान शनिवारी मध्येच अशीच एक रुग्णवाहिका बंद पडली.

पालघर येथे अनुसया भोईर या महिलेला तात्काळ रक्त आणि ऑक्सिजनची गरज होती. परंतू रक्त आणि ऑक्सिजन पालघरला उपलब्ध न झाल्याने १०८  रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेतून या महिलेला डहाणूला पाठवण्यात आलं. परंतु, पालघरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच ही रुग्णवाहिका बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करूनही त्यात अपयश आले. पर्यायी रुग्णवाहिकेची मागणी करूनही ती दीड तासापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही रक्त आणि ऑक्सिजनची तातडीची गरज असतानाही महिलेला उपचारासाठी तसेच थांबून राहावे लागले.

विशेष म्हणजे, तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या वेळी अशा रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर देणे आवश्यक असतानाही या रुग्ण महिलेबरोबर डॉक्टर दिलेला नव्हता. त्यामुळे पालघरचा आरोग्य विभागाचा निष्क्रियपणा दिसून आला.जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का उपलब्ध होऊ शकला नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राज्य आणि केंद्र सरकार आदिवासी विभागातील रुग्णसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र आदिवासी विभागातील रुग्णसेवेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.

पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यस्थेची स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आदीमध्ये डॉक्टरांची कमतरता असते. वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एका गर्भवती महिलेला उपचारासाठी कसे दोन-तीन तास फिरावे लागले आणि शेवटी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला, हे गेल्याच महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे पाठवला असला, तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नसताना आता पुन्हा रुग्णसेवेच्या हेळसांडीचा प्रकार उघडकीस आला आहे.

आदिवासी, दुर्गम भागामध्ये रुग्णसेवा तातडीने पोहोचणे आवश्यक आहे; परंतु अशाच भागामध्ये रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने गंभीर रुग्णांना जीव गमावा लागण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.

Leave a Comment

अधिक वाचा