मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक सुरू असून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेनंतर अनेक ठिकाण विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने महायूतीच्या पैकी 6 जागा बिनविरोध निवडणूक आल्या. यावरून राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. महायूतीच्या उमेदवारांना निवडणुकीत माघार घेण्यासाठी तब्बल 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राज्यातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी काही ठिकाणी अचानक माघार घेतली. ज्यामुळे महायूतीच्या 6 जागा बिनविरोध निवडूण आल्या. यानंतर राजकीय वातावरण तापलं असून घोडेबाजाराचा गंभीर आरोप केला जात आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास 150 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेवरून महायूतीवर निशाना साधताना संजय राऊत म्हणाले कि उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाली. कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ एका दिवसात सुमारे 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली, असा आरोप खळबळजनक आरोप त्यांनी केला. काही विरोधी उमेदवारांनी स्वतःचा भाव ठरवून व्यवहार केला, असही ते म्हणाले.
पुण्यात विक्रम राष्ट्रवादीचे (श.प) उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानं विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले. या निर्णयावर काँग्रेसनं संताप व्यक्त करत राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप केला. ठाणे-पालघर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रविंद्र फाटक यांच्याविरोधात शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पवार यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या निर्णयाबाबत पूर्वकल्पना किंवा चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षानं केला आहे.
कोकणात ठाकरे सेनेचे उमेदवार बाळ माने यांनी नितेश राणे यांच्यासोबत जात अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. ठाण्यात शरद पवार गटाचे अभिजीत पवारांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले. यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडूण आले. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत काँग्रेस आणि अपक्षांनी माघार घेतल्याने भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले.
संजय राऊत म्हणाले कि मी सांगत होतो कि आपल्याकडे संख्याबळ नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाने निवडणुका बिनविरोध होऊ नयेत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज शेवटपर्यंत टिकायला हवे होते. पण, निवडणुका बिनविरोधच करायच्या या सरकारच्या अट्टाहासापायी अनेक मार्गांचा अवलंब झाला. त्यात विरोधी पक्षांच्या उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न काही ठिकाणी यशस्वी झाला. आज दिवसभरात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
आतापर्यंत निवडणुकां घराणेशाहीवर होत होत्या. मात्र आता निवडणुकांनाच बगल देऊन थेट उमेदवारांनाच माघार घ्यायला लावून बिनविरोधचा पॅटर्न राज्यात गेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांपासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा थेट विरोधी उमेदवारच खरेदी करून बिन विरोध निवडूण येण्याची नवी प्रथा सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






