महत्वाचे – कष्ट करून जीवन जगणारे मुलं आजच्या विज्ञान युगातही जगभर आपल्याला दिसतात ,त्यामुळेच त्यांचे बालपण जीवन शिक्षण व खेळ यापासून खूप दूर गेलेले आहे.
बाल कामगारांच्या वेदना काय असतात हे सर्वांना समजले पाहिजे,सर्वांच्या लक्षात आले पाहिजे,त्याची जाणीव सर्वांना झाली पाहिजे यासाठी दरवर्षी १२ जून रोजी ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ साजरा केला जातो. आज प्रत्येकाला विचार करणे आवश्यक आहे की,’मुलांना शिक्षणच हवे काम नाही.’
सन -२००२ साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बालकामगाराच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर जनजागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी १२ जूनला सर्व देश, संस्था आणि समाजिक कार्यकर्ते बालकामगार विरोधी अभियानात सक्रिय सहभाग घेत आहेत. या निमित्ताने जगभरात अनेक देशांमध्ये चर्चासत्रे,रॅली,जनजागृती मोहीम,शाळांमध्ये उपक्रम या माध्यमांतून ‘बाल कामगार विरोधी दिन’ या विषयावर व्यापक जनप्रबोधन केले जाते .
बालकामगार म्हणजे १८ वर्षांखालील मुलांना शिक्षणाऐवजी जबरदस्तीने कोणतेही काम करायला लावणे. यामध्ये मुलांना अतिशय धोकादायक आणि अत्यंत खराब परिस्थितीत काम करायला लावले जाते.असे काम त्यांच्या शारीरिक, मानसिक,बौद्धिक आणि भावनिक आरोग्यावर विपरित परिणाम करते.कामगारांची मुले बाल कामगारी मुळे बालपण हरवून बसतात.त्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होते, ते आत्मविश्वास गमावून बसतात आणि पुढे त्यांचे संपर्ण आयुष्य तिमिरात जाते. ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, बालमजुरीला पूर्णपणे संपवण्याच्या दिशेने प्रयत्न करणे होय.जागतिक आकडेवारीनुसार अजूनही कोट्यवधी मुलं विविध देशात काम करण्यास भाग पाडली जात आहेत. विशेषतः दारिद्र्य, अविद्या,सामाजिक विषमता,आर्थिक विषमता, युद्धजन्य परिस्थिती आणि अपुरे कायदे हे त्यामागचे मुख्य कारणं आहेत.बालकामगारी थांबवण्यासाठी केवळ कायदे असून चालत नाही, तर समाजाची सक्रिय सहभाग पाहिजे.जर कोठेही मुलांना कामावर लावले जात असेल, शोषण केले जात असेल, तर त्याबाबत त्वरित स्थानिक प्रशासन अथवा बालसुरक्षा संस्थांना कळविले पाहिजे. यासोबतच गरजू कुटुंबांना सरकारच्या योजना, शिक्षणविषयक मदत आणि रोजगारविषयक पर्याय यांची माहिती देणेही महत्त्वाचे आहे. शिक्षणाच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे .‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा दिवस आपल्याला विचार करायला लावतो.एक सशक्त,शिक्षित आणि सन्मानित पिढी घडवायची असेल,तर बालमजुरीला थांबविणे अत्यंत आवश्यक आहे.ज्या वयात मुलांच्या हातात पाटी-पेन्सिल आणि खेळणी असायला हवीत, त्या वयात गरिबी व सामाजिक परिस्थितीमुळे त्यांच्यावर काम करण्याची वेळ येते. हा दिवस आपल्याला अशा मुलांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्याचे स्मरण करून देतो.बालमजुरीमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होणाऱ्या घातक परिणामांविषयी समाजात जनजागृती केली जाते.खाणी, कारखाने, हॉटेल किंवा इतर अत्यंत धोकादायक ठिकाणी काम करणाऱ्या बालकांना सुरक्षित करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे.भारतीय संविधानाने आणि कायद्याने बालमजुरीला पूर्णपणे प्रतिबंध केला आहे .बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा, १९८६: या कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या कामावर किंवा धोकादायक उद्योगांमध्ये ठेवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे .आपल्या आजूबाजूला किंवा हॉटेल्स, दुकाने, गॅरेज अशा ठिकाणी लहान मुले काम करताना दिसल्यास त्याला विरोध करा.बालमजुरी दिसून आल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरित संपर्क साधून तक्रार नोंदवा.गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी सढळ हाताने मदत करू या.
“बालमजुरी थांबवू ।
बालपण वाचवू ॥
बालकांना शिक्षण ।
वाचेल बालजीवन ॥
लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
समता गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक, अमरावती.
– ८०८७७४८६०९
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






