
शेअर मार्केट – गेल्या एका वर्षात शेअर बाजाराने प्रचंड अस्थिरता अनुभवली. कधीकाळी उच्चांकी शिखराच्या दिशेने वाटचाल करणारे भारतीय शेअर मार्केट अचानक १० टक्क्यांपर्यंत कोसळले, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले. पण या दरम्यान बाजाराने सुपर-फास्ट कमबॅक करून ठेपळलेली पारी सांभाळली आणि पुन्हा एकदा ऐतिहासिक झेप घेतली आहे.
शेअर मार्केटची धमाकेदार सुरुवात
गुरुवारी देशांतर्गत बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्सने इतिहास रचला, तर एनएसई निफ्टीची देखील सर्वकालीन उच्चांकी दिशेने वाटचाल सुरु राहिली. देशांतर्गत मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही तेजीची हिरवळ पाहायला मिळाली असून प्री-ओपनिंगला बीएसई सेन्सेक्स १३५.५४ अंकांनी किंवा ०.१६ % वाढीसह ८५ ,७४५ .०५ वर उघडला तर, निफ्टी५० ने ५५.९५ अंकांनी वाढून २६ ,६१.२५ वर सुरुवात केली आणि काही मिनिटांतच नवीन उच्चांकी मजल मारली.
दुसरीकडे, आशियाई बाजार तेजीत राहिले तर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेने अमेरिकन शेअर्स एका रात्रीत वधारले.
शेअर बाजारातील तेजीला चालना देणारे घटक
तज्ज्ञांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारात मोठी तेजी दिसून आली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे बाजार तेजीच्या वाटेवर परतला आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत एक टक्का घट झाल्याने महागाई कमी होण्यास मदत झाली असून डिसेंबरमध्ये ०.२५% व्याजदर कपात करण्याच्या शक्यतेबद्दल आरबीआय गव्हर्नरच्या विधानामुळे बाजारातील तेजीला चालना मिळाली.
गुंतवणूकदारांच्या रडारवर आज कोणकोणते शेअर्स?
आजच्या व्यवहारात पेटीएम, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, झायडस लाईफ आणि अशोका बिल्डकॉन हे फोकसमध्ये असतील. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेसना आवश्यक मान्यता दिली असून यामुळे आता PPSL पेमेंट अॅग्रीगेटर म्हणून काम करू शकेल. ही मंजुरी पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स अॅक्ट अंतर्गत देण्यात आली आहे, म्हणजे पीपीएसएल आता पेमेंटशी संबंधित व्यवहार हाताळू शकते.




