सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन’; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट…

SHARE:

नांदेड – एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील जातीभेद किती विखारी स्वरुपाचा आहे, याचे प्रत्यंतर गुरुवारी नांदेडमध्ये आले. नांदेडच्या मिलिंद नगर इटवारा परिसरात सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली. सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच वादातून आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश मामीडवार व साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून हत्या केली. या घटनेनंतर आंचल मामीडवार या तरुणीने केलेली कृती राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आंचल मामीडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पडले. या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. सक्षम ताटे याच्या अंत्यसंस्काराचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची होती. सक्षम आणि आंचल हे वयाने लहान असल्याने त्यांचे प्रेमप्रकरण, त्यांची समज आणि आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय याविषयी अनेक परस्परविरोधी मतं व्यक्त होताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील जातीभेदाचा विखार अजूनही किती भयंकर स्वरुपाचा आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही.

या सगळ्या घटनेविषयी आंचल मामीडवार हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तिने म्हटले की, गेल्या तीन वर्षांपासून सक्षम आणि माझे प्रेमसंबंध होते. ते आमच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांनीच सक्षमचा घात केला. माझे वडील गजानन मामीडवार, हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमची हत्या केली. सक्षम याच्यावर एमपीडी पडली होती. तो जेलमधून सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याची गेम टाकण्याच्या मार्गावर होते. ते मला धमकी देत होते की, आम्ही सक्षमला मारुन टाकणार. त्यांनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर नशा करुन त्याला मारले. सक्षमवर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. मग त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला मारले, असे आंचल मामीडवार हिने सांगितले.

 

आमचं प्रेम होतं. पण माझ्या पप्पांना आम्हा दोघांची जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हतं. ते म्हणायचे, दुसरं कोणाशीही बोल मी लग्न लावून देतो. सक्षम बौद्ध होता, आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत. जात वेगळी असल्यामुळेच माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवले. आमच्या प्रेमसंबंधामुळेच त्याला मारण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आंचल मामीडवार हिने म्हटले.

मी आयुष्यभर सक्षमसोबतच राहीन : आंचल मामीडवार

सक्षम ताटे याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला होता तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. सक्षमचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. सक्षमच्या मृतदेहाला आणि आंचलच्या अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. यानंतर तिने म्हटले की, मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन. मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षमसोबतच राहायचे आहे, असे आंचल मामीडवार हिने सांगितले.

Leave a Comment

अधिक वाचा