
पंजाब – सिद्धू मुसेवाला या पंजाबी गायकाच्या हत्येला जवळपास साडेतीन वर्ष लोटली आहेत. तो आता या जगात नाही, मात्र जगभरातील चाहत्यांना आनंद देणारा एक म्युझिक व्हिडिओ समोर आला आहे. या गायकाचे नवीन गाणे अलिकडेच रीलिज झाले. सिद्धू मूसेवालाच्या मत्यूनंतर रीलिज झालेले हे गाणे युट्यूबवर सध्या ट्रेन्डिंग असून विव्हज चे आकडे प्रत्येक मिनिटाला वाढत आहेत.
२९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात या प्रसिद्ध पंजाबी गायकाला सहा हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार मारले होते. गायकाला देण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर अवघ्या एकाच दिवसातच हा हल्ला झाला होता. मूसेवालाच्या निधनानंतर पंजाबी संगीत विश्वाचे मोठे नुकसान झाले आणि आजही चाहते या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करतात. आता गायकाच्या निधनानंतर साडेतीन वर्षांनंतर ‘बरोटा’ हे गाणे त्याच्या अधिकत युट्यूब चॅनेलवर रीलिज झाले आहे. स्वीताज ब्रारची मध्यवर्धी भूमिका असणारं हे गाणं २८ नोव्हेंबर रोजी रीलिज झाले आणि २४ तासांच्या आतमध्ये हे गाणं ट्रेंड होतंय. अवघ्या २४ तासात गाण्याचे विव्हज १७ मिलियनहून जास्त झाले आहेत.
या नव्या गाण्यात मूसेवालाचा आवाज पुन्हा एकदा ऐकून चाहते भावुक झाले आहेत. दिवंगत गायकाने ‘बरोटा’चे बोल लिहिले होते आणि संगीतही त्याचेच आहेत. त्याचे जुने फुटेज किंवा एआय-जनरेटेड व्हिज्युअल्सचा वापर या म्युझिक व्हिडिओमध्ये करण्यात आल्याचा अंदाज आहे. या गाण्यात मूसेवालाची झलक तर पाहायला मिळालीच, शिवाय त्याचे वडीलही झळकले आहेत. सिद्धूच्या निधनानंतर रीलिज झालेले हे त्याचे बारावे गाणे आहे. गाणे रीलिज होताच, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी भावुक होत प्रतिसाद दिला आहे.
मूसेवालाच्या निधनानंतर झाले होते छोट्या शुभदीपचे आगमन
सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतर मूसेवाला कुटुंबात आणखी एक महत्वाची घडामोड घडली. गायकाचे पालक बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी त्यांच्या दुसऱ्या अपत्याचे स्वागत केले, ज्याचे नाव शुभदीप असे ठेवण्यात आले आहे. मुसा गावातील घरी शुभदीपचा पहिला वाढदिवसही थाटामाटात साजरा करण्यात आला, ज्याकरता पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी उपस्थित होते.




