
रायगड – राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या आगामी निवडणुकीच्या तयारीलाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
किशोर जैन यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याबाबत माहिती देताना अजित पवार यांनी एक सोशल मिडिया पोस्ट केली आहे. यात अजित पवार यांनी म्हटले की, आज किशोर जैन यांच्यासह विविध पक्षांतील अनेक मान्यवरांनी पक्षाच्या विचारधारेला स्वीकारून जनसेवेची वाट धरली. या सर्वांचं मनापासून स्वागत आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा दिला. राजकारणात मूल्य, संस्कार आणि विकास यांची सांगड कशी घालायची, हे त्यांनी शिकवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच विचारांवर चालणारा पक्ष आहे. किशोर जैन यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात समाजकार्यातून केली. शिक्षण, सहकार आणि समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे.





