मुंबई – दुबार मतदार दिसला कि त्याला फोडून काढा, असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिवसेना (उबाठा) च्या कार्यकर्त्यांना दिला होता. यानंतर मुंबईतील पहिला दुबार मतदार सापडला आहे. मनसे उमेदवारांसमोर हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
मुंबईमध्ये आज महापालिकेच्या २२७ जागांसाठी मतदान पार पडत असून मतदार आपल्या मताधिकराचा हक्क बजावत आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरूवात झाली. वार्ड क्रमांक १९२ मधील मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळीच मतदान केलं. यशवंत किल्लेदार मतदान करण्यासाठी आले असता मतदान केंदरावर दुबार मतदारही आढळून आलेला आहे. या दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबविण्यात आले आहे. यावर ही सगळी निवडणूक आयोगाची चूक असल्याचं यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. वार्ड क्रमांक १९२ मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यात लढत आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. जर दुबार मतदार दिसला तर त्याला तिथेच फोडून काढा, असे थेट आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच ठाकरे गटाचे नेते हे मुंबईतील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर तैनात आहेत. त्यातच दादरच्या वॉर्ड १९२ मध्ये मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार स्वतः मतदान केंद्रावर उपस्थित असताना एका महिलेचे नाव दुबार यादीत असल्याचे समोर आले.
सध्या मुंबईतील सर्वाधिक हाय-व्होल्टेज लढत वॉड १९२ मध्ये होत आहे. दादरचा हा वार्ड प्रतिष्ठेचा मानला जात असून येथे प्रामुख्याने दोन तगड्या उमेदवारांमध्ये सामना होत आहे. मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रीती पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय बुधवारी रात्री मुंबईतील चेंबूर वॉर्ड क्रमांक १५३ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी घाटला गावातील मुंबई पब्लिक हायस्कूल मतदान केंद्रात बनावट ओळखपत्रांसह प्रवेश केल्याने तणाव निर्माण झाला. स्थानिक शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याने परिसरात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (डीसीपी) समीर शेख पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
अटक केलेल्या संशयितांना गोवंडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की संशयितांसोबत सापडलेल्या ओळखपत्रांची पडताळणी केली जात आहे आणि ते मतदान केंद्रात कोणत्या उद्देशाने घुसले याचा शोध घेतला जात आहे. मतदारसंघात शिवसेना (उबाठा) च्या मीनाक्षी पाटणकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या तन्वी काटे यांच्यात लढत आहे.




