मुंबई – आज मुंबई आणि पूणे सह इतर महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. या दरम्यान एक धक्कायादक प्रकार समोर आला आहे. राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीत मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईबाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे. यावेळी पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे मतदानानंतर बोटावरती लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी मुंबई आणि पूणे येथून समोर आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात असताना मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. हा मार्कर २०१२ पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पण या मार्करची शाई बोटावरुन पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
बोटावर मार्करने खूण केल्यानंतर फक्त नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीही दिली. कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदानानंतर बोटावरती लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी पुण्यात समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पुण्यात काही ठिकाणी मतदानानंतर बोटावरती शाई पुसून बोगस मतदान होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच काही महिला बोगस मतदान करत असल्याचा चाकणकरांचा दावा आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मध्ये अनेक महिला व मुले बोग मतदान करून बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत असल्याची तक्रार रूपाली चाकणकर यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदवली आहे..
निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. निवडणूक आयोगाने आता एक ‘पाडू’ नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीन असं त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे यंत्र वापरले जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यापूर्वी कधीही हे मशीन वापरण्यात आले नव्हते. मग निवडणूक आयोगाने आताच हे मशीन का वापरले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ऐन मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे.
याशिवाय निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा अनेक मतदारांना फटका बसत आहे. आयोगाच्या भोंगळ कारभाराचा पहिलाच फटका वनमंत्री गणेश नाईक यांना बसला. तब्बल एक तास फरफट झाल्यानंतर त्यांचं मतदान पूर्ण झालं. तर अनेक ठिकाणी यादीमध्ये नाव सापडत नाही, अनेक ठिकाणी इव्हीएम बंद पडल्याच्या, काही ठिकाणी ईव्हीएमचे बटन दाबले जात नसल्याचं, तर काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव सापडत नसल्याच्या घटना सकाळपासून समोर येत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांची हेळसांड झाली.




