सूर्या खूप मेसेज करायचा…’; अभिनेत्रीला तो दावा भोवला, १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल!

SHARE:

मुंबई : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबद्दल खळबळजनक विधान करणे टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जीला चांगलेच महागात पडले आहे. “सूर्यकुमार मला खूप मेसेज करायचा,” या तिच्या दाव्यानंतर आता तिच्यावर तब्बल १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

नेमका वाद काय आहे?
काही दिवसांपूर्वी खुशी मुखर्जीने एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक विधान केले होते. “मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचे नाही, तरीही अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे असतात. सूर्यकुमार यादव मला पूर्वी खूप मेसेज करायचा, पण आता आमचे बोलणे होत नाही,” असे ती म्हणाली होती. तिच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

१०० कोटींचा दावा कोणी ठोकला?
खुशीच्या या विधानामुळे सूर्यकुमार यादवची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत, फैजान अन्सारी नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सूर्यकुमारच्या चाहत्याने हे कायदेशीर पाऊल उचलले आहे. अन्सारीने गाझीपूर पोलीस ठाण्यात खुशीविरोधात तक्रार दाखल केली असून, तिच्यावर तात्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

फैजान अन्सारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हे सर्व प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले स्टंट आहेत. सूर्यकुमार यादव हा देशाचा गौरव आहे आणि त्याच्यावर असे बिनबुडाचे आरोप करणे खपवून घेतले जाणार नाही. म्हणून मी १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे आणि तिला किमान ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे”.

खुशी मुखर्जीचे स्पष्टीकरण वाढता वाद पाहता खुशीने आता सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आम्ही फक्त चांगले मित्र होतो आणि आमच्यात कोणतेही रोमँटिक नाते नव्हते. माझे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते आणि त्यातून काही चॅट्सचा गैरवापर केला गेला”.

सूर्यकुमार यादवने मात्र या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. तो सध्या आपल्या खेळावर आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत असून, नुकतेच त्याने पत्नी देविशा शेट्टीसोबत तिरुपती मंदिरात दर्शन घेतले होते.

Leave a Comment

अधिक वाचा