मुंबईत ठाकरेंचा थोड्या अंतराने पराभव, अखेरच्या क्षणापर्यंत दिली कडवी झुंज, भाजपवर जोरदार टीका

SHARE:

मुंबई – मुंबईत २२७ जागांवरचे निकाल जाहीर झाले आहेत. येथे ठाकरे यांच्या शिवसनेने महायूतीला काट्याची टक्कर दिली. भाजपला ८९, शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ जागांवर विजय मिळवला. मनसे ६, काँग्रेस २४, एमआयएम ९, समाजवादी पार्टीला २, अजित पवार गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे मुंबईत ठाकरेंना थोड्या अंतराने परभवाचा धक्का बसला आहे. जर शिवसेना आणि मित्रपक्षाला आणखी ३ जागा मिळाल्या असत्या तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता कायम राहिली असती.

मुंबईत ठाकरेंना थोड्या अंतराने परभवाचा धक्का बसला आहे. २५ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेली. मुंबईत भाजप महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुंबईत ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या घटली असली तरीही ठाकरेंनी दिलेली झुंज भाजपला अखेरच्या क्षणापर्यंत आव्हान देताना दिसल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजपच्या ८९ जागा आणि शिंदेसेनेच्या २९ जागा हा आकडा एकुण ११८ होतो. बहुमताला ११४ जागांची गरज आहे. तर शिवसेना उबाठा ६५, मनसे ६, कांग्रेस २४, एमआयएम ९ आणि शरद पवार गट एक जागा. एकुण हा आकडा १०५ होतो. यात अजित पवार गटाची ३ उमेदवार जोडले तर हा आकडा १०८  होतो. जर शिवसेना किंवा मनसेला आणखी ६ जागा मिळाल्या असत्या तर मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता कायम राहिली असती.

उद्धव सेनेच्या अनेक नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शिंदेसेनेने पुन्हा संधी दिली होती. भाजपसोबत युती असल्याने शिंदेसेनेच्या अधिक जागा निवडून यायला हव्या होत्या. मात्र, शिंदेसेना तिसऱ्या क्रमांकावर गेली. जागांच्या हिशोबाने आता शिवसेना ही ठाकरेंचीच यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिंदेसेनेच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांच्या व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नातेवाइकांचा पराभव झाला. यामुळे पक्ष बदल करणाऱ्यांना मुंबईकरांनी धडा शिकविला.

या निकालावर शिवसेना उबाठाने प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई शहराकडे भारताचे लक्ष लागले होते. प्रचंड भ्रष्टाचार, शाई घोटाळा, ईव्हीएम घोटाळा, पैसे वाटप, बोगस आणि दुबार मतदानाच्या ताकदीवर उद्योगपती अदानी यांचा भाजपच्या मदतीने मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. संपूर्ण निकाल येण्याआधीच भाजपने सुरू केलेला जल्लोष हा निवडणूक घोटाळ्याचाच भाग आहे, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
शिवसेना-मनसेने जोरात झुंज दिली, पण निवडणूक आयोग व सत्तेच्या मनमानीने घात केला. शेकडो मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. हे सर्व अधःपतन बघत निवडणूक आयोग अजगरासारखा पडून राहिला. मोदींच्या अमृतकाळात न्यायालयात न्याय मिळत नाही व निवडणुकांत निष्पक्ष निकाल लागत नाहीत. मतदारांना पैशांची चटक लावून संपूर्ण निवडणुकीवरच ताबा मिळवण्याचे तंत्र म्हणजे लोकशाही अशी नवी व्याख्या आता निर्माण झाली आहे. मतदान संपून २४ तास उलटले तरी मतदानाची टक्केवारी आयोग आणि पालिका आयुक्त देऊ शकले नाहीत, पण मतदार रांगेत उभे असताना भाजपच्या सोयीचे एक्झिट पोल वृत्तवाहिन्यांवर झळकले हा आचारसंहिता भंगाचा नवा चमत्कार जनतेने पाहिला, असंही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी ‘भाजप ॲप’ चा उघड वापर करत होते. निवडणूक अधिकारी मतदान केंद्रांवर बसून उघडपणे भाजपला मदत करत होते व त्याबाबतच्या तक्रारींची दखल निवडणूक आयोग घेत नसेल तर यापुढे निवडणुका न घेता सरळ नेमणुका करून आमदार, खासदार व नगरसेवकांना सभागृहात पाठवावे. इतक्या किळसवाण्या पद्धतीने मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, अशी टीका सामनाच्या अग्रलेखात शिवसेना उबाठाने केली आहे. भाजपचा भ्रष्ट, मस्तवालपणा सगळ्यांनाच गिळत आहे. सगळ्यांना गिळून झाल्यावर तो मुंबईचा व नंतर विदर्भाचा घास घेईल. मिंधे आज नाचत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या बरबाद करायला हातभार लावला आहे, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा