त्या सह्या आमच्या नाहीतच; अनेक पराभूत उमेदवारांचा घुमजाव, नवनीत राणां विरोधातील पत्रावर चुकून सह्या केल्या

SHARE:

अमरावती : महापालिका निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार केली. आता त्या तक्रारीवरून काहींनी घुमजाव केल्याचं दिसून आलं. तक्रारीच्या पत्रावर आम्ही चुकून सह्या केल्या, त्या आमच्या सह्या नाहीत अशी कारणं आता काही उमेदवार देत आहेत. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर २२  जणांनी नवनीत राणांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि राणांना भाजपमधून काढण्याची मागणी केली होती.

आता ज्या पराभूत उमेदवारांनी तक्रार केली, त्यातल्या बहुतांश उमेदवारांनी त्यावर स्पष्टीकरण देत व्हिडीओ प्रसारित केला. नवनीत राणांविरोधातील त्या तक्रारीवर आमच्या चुकून स्वाक्षऱ्या झाल्या असं काहींनी सांगितलं. तर त्या सह्या आमच्या नाहीत असा दावा काहींनी केला. नवनीत राणा आमच्या नेत्या आहेत आणि भविष्यातही राहतील असं काही पराभूत उमेदवारांनी म्हटलं.

भाजपचा एक गट राणांच्या विरोधात
त्या २२  जणांपैकी बहुतांश जण आता पलटले असल्याने मग ती तक्रार कुणी केली होती असा प्रश्न विचारण्यात येत आहे. भाजपचा एक मोठा गट नवनीत राणा विरोधात असून त्यांनीच हा खोडसाळपणा केला असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या तक्रारीवर पक्षाची एक टीम अमरावतीमध्ये जाऊन त्याची चौकशी करेल असं म्हटलं होतं. पण ज्यावेळी ही तक्रार प्राप्त झाली त्यावेळी भाजपचा मोठा गट नागपुरात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच नवनीत राणांविरोधातील ही तक्रार खोटी असल्याचा दावाही केला जात आहे.

नवनीत राणा यांच्याविरोधात भाजप मधील दुसऱ्या गटाने ही तक्रार तयार करून मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली असल्याचा बनाव केला आणि त्या तक्रारीवर खोट्या सह्या केल्या असा आरोप केला जात आहे. त्या तक्रारीबद्दल आम्हाला कल्पनाही नाही असा दावा काही पराभूत उमेदवारांनी दावा केला आहे.

मुख्यमंत्री तोडगा काढणार
राणा दाम्पत्याचं वर्चस्व अमरावती जिल्ह्यात वाढत असल्यानेच भाजप मधला अंतर्गत वाद उफाळून येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून आल्यावर नवनीत राणा यांच्याशी फोनद्वारे बोलणार असून संपूर्ण माहिती जाणून घेणार असल्याची माहिती आहे.

अमरावती महानगरपालिकेत भाजपला केवळ २५  जागा मिळाल्याने भाजपमध्ये नवनीत राणांविषयी प्रचंड नाराजी आहे. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या. भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे असा आक्रमक प्रचार नवनीत राणांनी केल्याचा आरोप पत्रामध्ये करण्यात आला. नवनीत राणांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट करतील असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा