पिंपरी-चिंचवड – सायबर गुन्हेगारांकडून, ज्येष्ठ नागरिकाची एक कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे. तर या प्रकरणात पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ,‘डिजिटल अरेस्ट’ चा धाक दाखवत, एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींला फसविल्याची गंभीर घटना समोर आली आहे. स्वतःला केंद्रीय तपास संस्थेचा अधिकारी, असल्याचे सांगून आरोपींनी विश्वास संपादन केला, आणि काही दिवसांतच १ कोटी रुपयांची रक्कम, त्या ज्येष्ठ नागरिकांकडून घेतली आहे.
चिंचवड परिसरात राहत असलेल्या, या ७७ वर्षीय नागरिकाला प्रथम, एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरचा व्यक्ती दूरसंचार विभागाशी, संबंधित असल्याचा दावा करत होता. त्यानंतर कॉल्सची मालिका सुरू झाली आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर आरोपींनी, स्वतःला सर्व्हिलन्स अधिकारी, नंतर तपास यंत्रणेशी जोडलेले अधिकारी असल्याचे भासवले आहे.
या ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर असलेले बँक खाते, मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले गेल्याचा बनाव करत, त्यांना अटक होण्याची भीती दाखवण्यात आली. मानसिक दबाव वाढवत ‘तपास पूर्ण होईपर्यंत घराबाहेर न पडण्याचा’ आदेश देत डिजिटल अरेस्टसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली. आरोपींनी कायदेशीर पडताळणीच्या नावाखाली, बँक खात्यातील आणि गुंतवणुकीतील रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये, वर्ग करण्यास भाग पाडले. तपासानंतर संपूर्ण रक्कम परत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर, आरोपींनी सर्व संपर्क बंद केला आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकाने, सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. तक्रारीनंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी, अज्ञात आरोपी, वापरलेले मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांविरोधात, गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, नागरिकांनी अशा फोन कॉल्सपासून सावध राहावे, असे आवाहन पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे. राज्यात काही ठिकाणी अशा घटना घडत आहेत, आरोपी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून, फसवणुक करत आहेत. याप्रकरणात अधिक तपास पिंपरी-चिंचवड पोलिस करत आहेत.




