मुंबई : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला गायक अरजित सिंहने अत्यंत धक्कादायक आणि चाहत्यांना भावुक करणारा निर्णय घेतला आहे. अरजितने यापुढे चित्रपटांसाठी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अरजितने ही घोषणा केली. अरजित सिंहने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत 300 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
आपण यापुढे कोणतेही पार्श्वगायन करणार नाही असं अरजितने सोशल मीडियावरुन जाहीर केलं. इतक्या वर्षात आपल्याला प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभारही मानले. पार्श्वगायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय करणार हे मात्र अरजितने स्पष्ट केलं नाही. अरजित ‘स्वतंत्र संगीत’ आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अरजित सिंगच्या या घोषणेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अरजित सिंगने अलिकडच्या काळात बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत.
अरजीत सिंग काय म्हणाला?
नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत मला इतके प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांचे मी आभार मानू इच्छितो. मी हे स्पष्ट करू इच्छितो की यापुढे मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी ते येथे संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.”
निर्णय मागे घेण्याची, चाहत्यांची मागणी
मंगळवारी रात्री ८.३० वाजता अरजितने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ही पोस्ट लिहित जाहीर केलं. अरजितच्या या पोस्टखाली त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. अरजितने पार्श्वगायन सोडू नये असं अनेकांनी त्याला आवाहन केलं. तर काही जणांनी त्याच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि त्याच्या योगदानाबद्दल आभार मानले.
अरजित सिंहचा करिअर प्रवास
अरजित सिंहने २००५ मध्ये फेम गुरुकुल या रिॲलिटी शोमधून आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. २०११ मध्ये, ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याच्या माध्यमातून अरजितने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने ‘वो तुम ही हो’, ‘बिनते दिल’ आणि ‘केसरिया’ यासह अनेक हिट गाणी दिली आहेत. अरजीतने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील जिंकले आहेत. २०२५ मध्ये अरजीतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





