नवी दिल्ली – आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पातून लोकांना महागाई कमी होण्याची आणि दैनंदिन खर्चात दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच लोकांना महागाईचा एक मोठा झटका बसला आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४९ रुपयांची वाढ केली आहे. मात्र १४ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
आज देशाचा अर्थसंकल्प सुरू असताना फेबु्रवारी महिन्याच्या पहिल्याच दिवस महागाई घेवून आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक १९ किला एलपीजी सिलिंडरच्या किमती ४९ रूपयांनी वाढवल्या आहेत. या वाढीमुळे नवीन किंमत १,७४०.५० रुपयांवर पोहोचली आहे. आज पासून देशभरात या किमती लागू झाल्या आहेत. यामुळे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांमध्येही १९ किलो व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत.
दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५८०.५० वरून १६९१.५० रुपये झाली. कोलकातामध्ये किंमत १६८४ वरून १७९५ रुपये झाली आहे. मुंबईत १५३१.५० वरून १६४२.५० रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये किंमत १७३९.५० वरून १८४९.५० रुपये झाली. एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. गेल्या जानेवारीच्या सुरुवातीला तेल विपणन कंपन्यांनी किंमती १११ रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या. आता पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी ४९ रूपयांची वाढ केली आहे.
अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारकडून दिलासा मिळण्याची आशा असलेल्या लहान व्यवसाय, हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तर दुसरीकडे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, भोजनालये आणि रस्त्यावरील खाद्य पदार्थ महाग होण्याची शक्यता आहे. किंमत वाढीमुळे लोकांचा खर्च स्पष्टपणे वाढतील, ज्यामुळे शेवटी अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो आणि सामान्य ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो.





