मुंबई – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर ३१ जानेवारी म्हणजे शनिवारी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र आता या शपथविधीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्रिपद धोक्यात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या कि सुनेत्रा पवार राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्यामुळे खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर जोपर्यंत राष्ट्रपती राजीनामा स्वीकारत नाही, तोपर्यंत दुसरं पद घेता येत नाही. आत्ताचा घटकेला सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिला होता, मात्र तो स्वीकारला गेला होता का याबद्दल कुठलीही माहिती नाही. सुनेत्रा पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण तसं न करता संवैधानिकसाठी त्यांनी पहिले राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली पाहिजे होती. कारण उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नाहीय. त्यामुळे सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्रिपद धोक्यात आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
याशिवाय सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रपदाच्या शपथविधीवरून वर्धा येथील वकील हर्षवर्धन गोडघाटे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये गोडघाटे यांनी सुनेत्रा पवारांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रानुसार उपमुख्यमंत्रीपद हे असंवैधानिक आहे. भारतीय संविधानात उपमुख्यमंत्री पदाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेली शपथ बेकायदेशीर ठरते. म्हणून सुनेत्रा पवार यांना भारतीय संविधानाच्या 3 अनुसूचित राज्याच्या मंत्र्यांकरिता पदाच्या शपथेचा नमुना दिला आहे. त्यानुसार शपथ देऊन त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी. अन्यथा महाराष्ट्र राज्यात संविधान रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच संविधानाचे उघड उल्लंघन होत असल्याचा संदेश जाईल. त्यामुळे त्यांना पुन्हा शपथ देण्यात यावी, अशी मागणी गोडघाटे यांनी केली.
या आक्षेपावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे म्हणाले कि आम्हाला तांत्रिक बाबी पडताळून घेण्याचं राजकीय भान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असल्यामुळे तेवढं तरी आम्हाला माहित आहे. कुणाला शपथ घेता येते, सदस्य नसेल तरी किती कालावधी पदावर व्यक्ती राहू शकतो. 2002 सालचं अजित पवार यांचं उदाहरण आहे, शरद पवार यांचं उदाहरण आहे, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याने ‘घाई’ झाल्याची टीका होत होती. यावर तटकरे म्हणाले कि हा शपथविधी घाईत झालेला नाही. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ७२ तासांनी हा शपथविधी पार पडला.





