नाशिक – मालेगाव महापालिकेत महापौरपदासाठी इस्लाम पार्टी विरुद्ध शिवसेनेत लढत झाली आहे. तर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद महापौरपदी विजयी झाल्या आहेत. मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांची निवड झाली आहे, तर मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांची निवड झाली आहे. मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टी व उपमहापौरपदी समाजवादी पार्टी विजयी झाल्या आहेत. मालेगाव महापालिकेच्या महापौरपदावर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महापौरपदासाठी झालेल्या लढतीत शेख नसरीन बानो यांना एकूण ४३ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना १८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शेख नसरीन बानो यांनी २५ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
आज मालेगाव महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रियेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. यावेळी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव उपस्थित होते. मालगाव महापालिका महापौरपदासाठी एकूण ५ अर्ज दाखल झाले होते. तपासणीनंतर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, शेख ताहेरा शेख रशीद आणि शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. इस्लाम पार्टीच्या शेख ताहेरा शेख रशीद यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने, शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यात सरळ लढत झाली आहे. भाजप आणि एमआयएमची तटस्थ भूमिका राहिली आहे.
या निवडणुकीसाठी महापालिका सभागृहात इस्लाम पार्टीचे ३५, समाजवादी पार्टीचे ५ , काँग्रेसचे ३, शिवसेनेचे १८, भाजपचे २ आणि एमआयएमचे २१ नगरसेवक उपस्थित होते. भाजप आणि एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने इस्लाम पार्टीला विजय झाला. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांना समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यासह ४३ मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांना केवळ १८ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला आहे. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरपदावर समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांनी विजय मिळवला आहे. झालेल्या थेट लढतीत शान-ए-हिंद यांना ४३ मते मिळाली, तर शिवसेनेचे निलेश काकडे यांना १८ मतांवर समाधान मानावे लागले. उपमहापौरपदासाठी एकूण 8 अर्ज दाखल झाले होते.
तपासणीनंतर समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद, एमआयएमचे हाफिज अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, शिवसेनेचे नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, निलेश काकडे तसेच समाजवादीचे मोहम्मद मुश्तकिन मोहम्मद मुस्तफा यांचे अर्ज वैध ठरले. एमआयएमचे हाफिज अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, समाजवादीचे मोहम्मद मुश्तकिन मोहम्मद मुस्तफा आणि शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने शान-ए-हिंद आणि शिवसेनेचे निलेश काकडे यांच्यात लढत झाली. इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने शान-ए-हिंद यांनी उपमहापौरपदावर विजय मिळविला आहे. मालेगाव महापालिका प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसरात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि प्रत्येक सदस्याची तपासणी करण्यात आली होती.




