मुंबई – मंत्री पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेंच्या अडचणी वाढणार आहेत. तर वरळी पोलिसांकडून याप्रकरणात मंत्री पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेंच्या विरोधात ११०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जें यांनी ऑडिओ क्लिपमध्ये पत्नीला मारहाण केल्याची कबुली दिली आहे. तर जुन्या प्रेमप्रकरणांबाबतचाही उल्लेख केला आहे. राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी ११०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणात आरोपी अनंत गर्जे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र सध्या ते जामिनावर बाहेर असून, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. वरळी पोलिसांच्या तपासानुसार, कौटुंबिक वाद हे या आत्महत्येमागील मुख्य कारण ठरले आहे. पती-पत्नीमध्ये सतत होणाऱ्या वादातून मानसिक तणाव वाढत गेला. आणि त्यातूनच पत्नीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.
वरळी पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात, तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल, मृत महिलेच्या कुटुंबीयांचे जबाब, तसेच घटनास्थळी करण्यात आलेल्या तपासाची माहिती समाविष्ट केली आहे, वरळी पोलिसांनी तपासात सर्व बाजूंनी पुरावे गोळा करत, प्रकरण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणातील आरोपी अनंत गर्जे यांचा मोबाईल फोन हा मोबाईल प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तपासणीत मोबाईलमधून काही ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्या आता न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या आहेत.
या ऑडिओ क्लिप्समध्ये अनंत गर्जे आणि त्यांच्या पत्नीमधील संभाषण आहे. एका ऑडिओ क्लिपमध्ये गर्जे यांनी पत्नीला मारहाण केल्याची कबुली दिली आहे. यातून काही ऑडिओ क्लिप ज्यात गर्जे यांचे त्यांच्या पत्नीशी संवाद आहे तो न्यायालयासमोर आणला आहे. तसेच जुन्या प्रेमप्रकरणाबद्दल घरच्यांना काही सांगितल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. वरळी पोलिसांनी पती अनंत गर्जे याच्यासह दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.





